भाकरी देणाऱ्या गावाचे ऋण समजून ‘जिओ जिंदगी’चे रुग्णालय

बीड : करोना काळाने आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले असून ग्रामीण भागातील नागरिकांची तोळामासा आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन आणि पहिल्या लाटेत शहरातील रोजगार गेलेल्या बेरोजगारांसाठी भाकरी देणाऱ्या गावच्या ग्रामस्थांवर उपचार करण्यासाठी ‘जिओ जिंदगी’च्या माध्यमातून नि:शुल्क सेवेचा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या उपक्रमात काही डॉक्टरांनी आपले रुग्णालये बंद करून सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जिओ जिंदगीने करोनाच्या पहिल्या लाटेत गावागावातून भाकरी गोळा करून त्या शहरात आणत भुकेल्या, गरजूंची भूक भागवली. भाकरी देणाऱ्या गावांविषयी कृतज्ञतेचा भाव ठेवून जिओ जिंदगीने दुसऱ्या लाटेत शहराकडून आरोग्य दूतांकरवी सेवा देत उपचार सुरू केले आहेत. बीड तालुक्यातील घाटसावळी, पिंपळनेर, जरुड, अंजनवती या गावांमध्ये रुग्णालयाच्या माध्यमातून मोफत उपचार केले जात आहेत. या उपक्रमासाठी भागवत तावरे, धनंजय गुंदेकर व अन्य युवकांनी सेवेचे व्रत हाती घेतले आहे. या सेवाव्रतींनी करोनाच्या पहिल्या लाटेत गावोगाव, वाडी-वस्त्यांवर दिवस-दिवस फिरुन भाकरी गोळा केली. या भाकरी शहरात आणून भुकेल्या आणि गरजूंना भरवल्या.

टाळेबंदीने अनेकांचे रोजगार हिरावले. तर काहींवर उपासमारीची वेळ आली. रुग्णांसोबत शहरात आल्यानंतर सोबतच्या नातेवाईकांची जेवणाची व्यवस्था काय? हा प्रश्न जिओ जिंदगीने उपस्थित होऊ दिला नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेतही मदतीचा महायज्ञ सुरूच असून भाकरी देणाऱ्या गावात रुग्णालय सुरू करण्याचा निर्धार जिओ जिंदगीने केला आणि अल्पावधीत चार ते पाच गावांमध्ये रुग्णालयेही सुरू केली. दुर्गम आणि डोंगरपट्टय़ातील भागामध्ये ग्रामीण जनतेला नि:शुल्क उपचाराची सुविधा देतानाच त्यांना मानसिक आधार देण्याचे काम या मोहिमेतून केले जात आहे. काही वैद्यक व्यावसायिकांनी स्वत:चे रुग्णालय बंद करून जिओ जिंदगीच्या सेवेत वाहून घेतले आहे. त्यामध्ये डॉ.अंकुश हुंबे, डॉ. कृष्णा राऊत, डॉ. ओम साळुंके यांच्यासह अन्य वैद्यक व्यावसायिक असून करोनासारख्या महामारीच्या काळात नि:शुल्क उपचार करून रुग्णसेवेसाठी स्वतला तत्पर ठेवले आहे. जिओ जिंदगीच्या माध्यमातून थेट दारात घेऊन जाणारी मोबाइल रुग्णालयांची मोहीम सुरू करण्यात आली आहे. गांधीजींनी सांगितलेला ‘खेडय़ाकडे चला’ संदेश जिओ जिंदगीने आरोग्य सेवेच्या अभियानानातून प्रत्यक्षात उतरवला आहे.

उपचाराबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करून त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे या उपक्रमातील भागवत तावरे यांनी सांगितले.