News Flash

माणुसकीचा गहिवर अन् संवेदनाहीन लूट

पवार यांचे शवविच्छेदन करण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली.

प्रतिकात्मक छायाचित्र

महामार्गावर अपघातात मरण पावलेल्या निराधार व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी एका बाजूला माणुसकीचे हात सरसावले असताना दुसऱ्या बाजूला मात्र संवेदनशून्य लोक लुटीसाठी केलेला आटापिटा करत होते. पाडव्याच्या दिवशी नेवासे येथे घडलेला हा प्रसंग विविध मानवी प्रवृत्तींचे दर्शन तर घडवतेच, पण अपप्रवृत्ती पैशांसाठी कोणत्या थराला गेल्या आहेत, त्याचा अनुभवही येतो. पाडव्याच्या दिवशी प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचाच हा प्रकार ज्ञानेश्वरांच्याच कर्मभूमीत घडला.

नगर-औरंगाबाद महामार्गावर वडाळाबहिरोबा (ता. नेवासे) शिवारात लक्ष्मण धोंडिराम पवार (वय ४५) यांना एका मालमोटारीने पाडव्याच्या दिवशी धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो नेवासेफाटा येथील रुग्णालयात आणला. मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिसांनी सुरू केले. पवार हे नेवासे तालुक्यातीलच म्हाळसिपपळगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले. पवार यांना जवळचे नातेवाईक कोणीही नव्हते, मात्र भावकीतील लोक त्यांना सांभाळत. ते नेवासेफाटा येथे आले. दूरचे नातेवाइकही जमा झाले.

पवार यांचे शवविच्छेदन करण्यापूर्वी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पैशांची मागणी केली. शवविच्छेदनासाठी ९५० रुपयांची मागणी करण्यात आली. सामाजिक कार्यकत्रे आप्पासाहेब गायकवाड यांनी एवढ्या पैशांची गरज काय, असा सवाल केला. त्यावर त्यांनी कापड, स्प्रे, एरंडीचे तेल, हातमोजे, प्लॅस्टिक आणायला सांगितले. त्याकरिता ५०० रुपये खर्च आला. त्यानंतर रुग्णवाहिका करून मृतदेह म्हाळसिपपळगावला नेण्यात आला. केवळ २५ किलोमीटर अंतर असलेल्या या प्रवासासाठी ३ हजार रुपयांची मागणी करण्यात आली.

मात्र तडजोडीनंतर २ हजार रुपये देण्यात आले. खरेतर या प्रवासासाठी अवघे ५०० ते ७०० रुपये आकारणे गरजेचे होते. मात्र ४० रुपये प्रतिकिलोमीटर या दराने पसे आकारण्यात आले. माणसाचा मृत्यू हा नेहमी दु:ख देणारा प्रसंग असतो. त्या प्रसंगात लूटमार करणाऱ्या प्रवृत्तींमुळे लोक अस्वस्थ झाले.

पवार यांच्या दूरच्या नात्यातील मंडळींनी १० हजार रुपये जमा करून पाडव्याच्या दिवशी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. या मंडळींना समाजातील पशासाठी अपप्रवृत्तींच्या दमबाजीलाही सामोरे जावे लागले. नाभिक समाजातील सामान्य कुटुंबातील हे लोक दु:खात दमन व शोषणाला बळी पडले.

ग्रामीण रुग्णालयाची चौकशी करा

शवविच्छेदन करण्यासाठी पैशांची अवास्तव मागणी करण्याचा प्रकार चुकीचा आहे. दु:खाच्या प्रसंगातही लूट केली जाते. आता असे प्रसंग घडल्यास भावनेला आवर घालून नातेवाइकांनी आर्थिक तडजोड केल्यानंतरच मृतदेह घरी न्यावा. प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याच्या प्रकाराची चौकशी करून कारवाई करावी.

– आप्पासाहेब गायकवाड, सामाजिक कार्यकत्रे, नेवासे फाटा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2017 3:02 am

Web Title: hospital staff demand money before post mortem of dead body
Next Stories
1  ‘एसटी बंद’मुळे खासगी वाहतूकदारांची दिवाळी
2 बनावट आधारकार्डच्या माध्यमातून बेग टोळीच्या गुन्हेगारी कारवाया
3 महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संपत्तीची ईडीमार्फत चौकशी करा, शिवसेनेची मागणी
Just Now!
X