रवींद्र केसकर

महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत जिल्ह्यातील आठ खाजगी दवाखान्यांनी कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळविला आहे. तरीदेखील करोनाच्या रूग्णांवर उपचार करण्यास ते जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहेत. उस्मानाबादमधील आशा चार खाजगी दवाखान्यांना जिल्हा प्रशासनाने चांगलेच खडसावले आहे. वेळोवेळी तोंडी आणि लेखी सूचना देऊनही जाणीवपूर्वक टाळाटाळ करणाऱ्या या चारजणांवर साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराच जिल्हा प्रशासनाने नोटीसीद्वारे बजावला आहे. यात सह्याद्री आणि सुविधा या खाजगी दवाखान्यांसह अन्य दोन रुग्णालयांचा समावेश आहे.

महाराष्ट्रात करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून राज्यातील १०० टक्के जनतेला मोफत आरोग्य उपचार देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने जाहिर केला. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयालाच हरताळ फासण्याचे काम उस्मानाबादमधील या खाजगी रुग्णालयांनी केले आहे. वेळोवेळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आणि जिल्हा प्रशासनाने सूचना देऊनही करोनाच्या रुग्णांवर जाणीवपूर्वक उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सह्याद्री, सुविधा, चिरायू आणि वत्सल या चार खाजगी दवाखान्यांना २४ तासांच्या आत खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खुलासा न केल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे समजून साथरोग नियंत्रण आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंद करणार असल्याची नोटीस जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी बजावली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील एकूण १६ रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लागू आहे. त्यातील आठ रुग्णालय सरकारी तर आठ खाजगी आहेत. उमरगा शहरातील तीन, लोहारा तालुक्यातील एक आणि उस्मानाबाद शहरातील या चार रुग्णालयांचा यात समावेश आहे. सरकारी दवाखाने वगळता या आठ खाजगी रुग्णालयांनी आजवर विविध शस्त्रक्रिया आणि उपचरांपोटी या योजनेअंतर्गत सुमारे १४ कोटी रुपयांचा लाभ स्वतःच्या पदरात पाडून घेतला आहे. यांपैकी ४५ लाख रुपयांचा लाभ लॉकडाउन कालावधीत मिळविला आहे. मात्र राज्य शासनाने स्पष्ट निर्देश असतानाही करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यास शहरातील सह्याद्री, सुविधा, चिरायू आणि वत्सल रुग्णालये टाळाटाळ करीत असल्याचे जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या नोटीसीत म्हटले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेतलेल्या रुग्णांच्या काही तक्रारी असल्यास त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे लेखी स्वरूपात तक्रारी नमूद कराव्यात असे आवाहनही जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे यांनी केले आहे. कोट्यवधी रुपयांचा शासकीय लाभ पदरात पाडून घेणारे संबंधित रुग्णालय आता काय खुलासा करणार याकडे आरोग्य क्षेत्रातील अनेकांचे लक्ष लागले आहे.

चौदापैकी तब्बल साडेबारा कोटी सह्याद्री व सुविधाच्या तिजोरीत

जिल्ह्यात ही योजना लागू झाल्यापासून आजवर १३ हजार ५६४ उपचार व शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यांपैकी सह्याद्री रुग्णालयात ९ हजार २५० शस्त्रक्रिया व उपचार झाले असल्याची आकडेवारी आहे. त्यापोटी सह्याद्री रुग्णालयास आजवर ९ कोटी ४१ लाख ३४ हजार २५० रुपयांचा लाभ झाला आहे. तर सुविधा रुग्णालयात २ हजार २७८ उपचार व शस्त्रक्रिया केल्या असल्याची नोंद आहे. त्यापोटी त्यांना आजवर २ कोटी ९९ लाख रुपये मिळाले आहेत. त्याव्यतिरिक्त चिरायू व वत्सल या रुग्णालयात ही योजना नव्याने राबविली जात असल्याने त्यांनी मागणी केलेल्या बिलाची एकूण रक्कम ३० लाख रुपयांच्या घरात असल्याची माहिती लातूर येथील महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक डॉ. संजय गटकल यांनी दिली आहे.