पावसाच्या निरोपानंतर राज्यभरात तापमानात वाढ

राज्यातून नैर्ऋत्य मोसमी पावसाने निरोप घेतल्यानंतर अंगाची लाही आणि जिवाची काहिली होऊ लागली आहे. पारा वर चढू लागल्याने ऊन भाजून काढू लागले आहे आणि घामाच्या धारांनी अंग भिजू लागले आहे.

राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ होत आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडा वाढत आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ३७ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. राज्यात रविवारी सर्वाधिक तापमान सांताक्रूझ येथे ३७.८ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. अकोला आणि बीड येथेही पारा ३७ अंशांवर पोहोचला.

राज्यात चार महिने मोसमी वारे वाहत होते, परंतु काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने या भागांची परतीच्या पावसावर भिस्त होती. मोसमी पावसाने २९ सप्टेंबरला राजस्थानमधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तो परतताना चांगला बरसेल असा अंदाज होता. परंतु पावसाला पोषक स्थिती निर्माण न झाल्याने त्याने निराशा केली. ६ ऑक्टोबरला मोसमी पावसाने राज्याचा निरोप घेतल्याचे हवामान विभागाने जाहीर केले. ढगाळ वातावरण आणि पावसाळी स्थिती दूर होताच तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच भागांत उकाडा वाढला आहे.

मध्य महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वर वगळता सर्व ठिकाणी तापमान ३० अंशांच्या वर गेले आहे. राज्यात महाबळेश्वरचे तापमान सर्वात कमी आहे. त्यामुळे तेथे रात्री काहीसा थंडावा अनुभवता येतो. रविवारी महाबळेश्वरचे कमाल तापमान २६.३ आणि किमान तापमान १७.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कोकणात मुंबई, सांताक्रूझ, रत्नागिरीत सर्वाधिक तापमान आहे. या भागात ३५ अंशांपुढे तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाडय़ात सर्वाधिक तापमान बीडमध्ये ३७ अंश सेल्सिअस आहे. इतर ठिकाणीही पारा ३५ अंशांवर गेला आहे.

विदर्भामध्ये अकोल्यात सर्वाधिक ३७ अंश सेल्सिअस तापमान आहे. इतरत्र कमाल तापमान ३५ अंशांच्या वर आहे. दरम्यान, यापुढेही तापमानात काहीशी वाढ होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पाऊस वेळेआधीच माघारी : यंदा ८ जूनला दाखल झालेल्या मोसमी पावसाने २३ जूनला महाराष्ट्र व्यापला होता. ६ ऑक्टोबरला त्याने राज्याचा निरोप घेतला. सोमवारी तो देशाचा निरोप घेणार आहे. गेल्या आठ वर्षांत यंदा मोसमी पावसाने महाराष्ट्राचा निरोप लवकर घेतला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी आणि २०११ मध्ये २४ ऑक्टोबरला, २०१३ मध्ये २१ ऑक्टोबर, २०१२ आणि २०१५ मध्ये १५ ऑक्टोबरला, २०१४ मध्ये १८ ऑक्टोबरला आणि २०१६ मध्ये १६ ऑक्टोबरला मोसमी पाऊस राज्यातून परतला होता.