युरोपला जाणाऱ्या हापूस आंब्यावरील उष्णजल प्रक्रियेच्या कालावधी आणि तापमानाबाबत अजूनही अनिश्चितता कायम असल्यामुळे यंदाच्या हंगामात मोठय़ा प्रमाणात निर्यातीला मर्यादा आल्या आहेत.  कोकणातील हापूस आंब्यामध्ये फळमाशीच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी युरोपीय देशांनी उष्णजल प्रक्रियेची अट घातली. त्यामुळे या आंब्याच्या निर्यातीला मोठा फटका बसला. गेले वर्षभर या संदर्भात विविध पातळ्यांवर संशोधन करण्यात आले. येथील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार हिरव्या आंब्यावर ४७ अंश तापमानाला ५० मिनीटे उष्णजल प्रक्रिया केल्यास फळमाशीचा नायनाट होऊ शकतो. पण या संदर्भातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी तापमान ४८ अंश आणि कालावधी एक तासापर्यंत वाढवण्याची सूचना केली आहे. तसे झाल्यास आंबा खराब होण्याची भिती स्थानिक बागायतदारांकडून व्यक्त केली गेली आहे. त्यामुळे यंदाही या आंब्यावर युरोपीय देशांना अपेक्षित उष्णजल प्रक्रिया करुन आंबा निर्यात करणे शक्य झालेले नाही.

दरम्यान ‘व्हेपर ट्रीटमेंट’ केलेला आंबा युरोपीय देशांमध्ये स्वीकारला जात असल्याने आजपासून तशा प्रकारचा आंबा पाठवण्यास सुरवात झाली आहे.

या प्रक्रियेव्दारे सुमारे पाचशे किलो आंबा आज युरोपला रवाना झाला. पण या प्रक्रियेची क्षमता मर्यादित असल्यामुळे जास्त प्रमाणात आंबा निर्यात केला जाऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत उष्णजल प्रक्रियेबाबत सर्वमान्य तोडगा न निघाल्यास यंदाही आंब्याच्या युरोपातील निर्यातीला खीळ बसणार आहे.