01 October 2020

News Flash

हाफ पँट आणि स्लीपर घातल्याने हॉटेलमधून तरुणांना काढले बाहेर

संबंधित हॉटेल चालकांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे

प्रातिनिधिक छायाचित्र

हॉटेलमध्ये प्रवेश करण्यासाठीही आता ड्रेसकोड आहे की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पुण्यात नुकतीच एक अजब घटना घडली आहे. हॉटेलमध्ये आलेल्या तरुणांनी हाफ पँट आणि स्लीपर घातल्याने त्यांच्यावर हॉटेल प्रशासनाने त्यांना चक्क बाहेरचा रस्ता दाखवला. अशाप्रकारचे कपडे घालणे हॉटेलच्या नियमावलीत बसत नसल्याने या तरुणांना बाहेर काढण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील ‘एजंट जॅक’ या हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता ग्राहकांनी कोणते कपडे आणि पादत्राणे घालायची हेही हॉटेलचालक ठरवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. ही घटना एक दोघांसोबत नाही तर हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलेल्या संपूर्ण ग्रुपसोबतच घडली.

पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये हे हॉटेल आहे. हे तरुण मंगळवारी रात्री जेवण्यासाठी या हॉटेलमध्ये गेले. त्यावेळी या मुलांनी हाफ पँट आणि पायात स्लीपर घातल्याचे कारण पुढे करत त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. याबाबत आपण आपल्या हॉटेलमध्ये नियमावलीही लावली असल्याचे हॉटेलच्या संचालकाने सांगितले. तुम्ही केलेला वेश आमच्या हॉटेलमधील सुविधा घेण्यास योग्य नसल्याने तुम्हाला प्रवेश नाकारण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. हे सगळे तरुण संगणक अभियंते असून ते नामांकित आयटी कंपनीमध्ये नोकरी करतात.

याबाबत चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधित हॉटेल चालकांच्या विरोधात आवश्यक ती कारवाई करावी अशी मागणी या तरुणांनी केली आहे. अशाप्रकारचे खासगी गोष्टींबाबतचे नियम लावणे हे मुलभूत हक्कांवर गदा आणणारे असल्याने या गुन्ह्याची नोंद व्हावी असे मत यातील एका तरुणाने व्यक्त केले. हॉटेलने लावलेल्या नियमावलीत ग्राहकांनी कोणता वेश करावा याबरोबरच याठिकाणी बॉलिवूड गाणी वाजविता येणार नाहीत असाही नियम देण्यात आला आहे. याशिवायही अनेक अजब नियम यामध्ये देण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 1:20 pm

Web Title: hotel in pune denied entry for dinner because customers were wearing half pant and sleeper
Next Stories
1 उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही राज्यातील रस्त्यांवर धोकादायक वाहने
2 जिओ इन्स्टिटय़ूट पुण्यात? शिक्षण क्षेत्रात अनभिज्ञता
3 बालकांवर अत्याचार करणाऱ्या विकृत मनोवृत्तीला जरब!
Just Now!
X