News Flash

अनलॉक ५ : हॉटेल, उपहारगृहं, बारसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर

५ ऑक्टोबरपासून उपहारगृहे, बार सुरू करण्यास परवानगी

करोनामुळे राज्याचा गाडा विस्कळीत झाला असून, आर्थिक ताण वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेनं राज्य सरकारनं मोठं पाऊल टाकलं आहे. अनेक दिवसांपासून मागणी होत असल्याने सरकारनं उपहारगृहे व बार सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील प्रवासी वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी राज्यांतर्गत रेल्वे सुरू करण्याचा निर्णयही सरकारनं घेतला आहे. मुंबईतील डबेवाल्यांनाही राज्य सरकारनं दिलासा दिला आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून आता हॉटेल, बार, उपहारगृहे सुरू करण्यासंदर्भातील नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात करोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्यानं राज्य सरकारनं काही निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, ऑक्टोबरपासून अनेक गोष्टींवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील उपहारगृहे, बार सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानंतर ५ ऑक्टोबरपासून राज्यातील उपहारगृहे आणि बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एकूण क्षमतेच्या ५० टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं बंधन सरकारन घातलं आहे.

पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर सिंह यांनी आदरातिथ्य क्षेत्रातील विविध उपहारगृहे आणि हॉटेल संघटनांना पत्राद्वारे नियमावलीची माहिती दिली आहे. करोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने एसओपीमध्ये देण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांचे रेस्टॉरंटस् (कॅफे, कँटीन, डायनिंग हॉल, परवानाधारक फूड अँड बेव्हरेजेस (एफ अँड बी) युनिटस्/आऊटलेटस्, हॉटेल/रिसॉर्ट/क्लब यांचा अंतर्गत किंवा बाह्य भाग यांसह) आणि बार यांनी तंतोतंत पालन करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

काय आहे नियमावली ?

 • उपहारगृहांचा दरवाजा कर्मचाऱ्यांपैकीच कोणी उघडावा.
 • प्रत्येक ग्राहकाची प्रवेशद्वारावर स्क्रिनिंग केली जावी. ग्राहकाला करोनाची लक्षणं आहेत का नाही याची पडताळणी व्हावी.
 • कोणतीही लक्षणं नसलेल्या ग्राहकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावा.
 • ग्राहकांना सेवा पुरवताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं.
 • हॉटेल, उपहारगृहांमध्ये आलेल्या ग्राहकांची नोंद ठेवावी.
 • कोणत्याही ग्राहकांना मास्क शिवाय परवानगी दिली जाऊ नये. केवळ अन्नपदार्थांचं सेवन करताना मास्क काढण्याची परवानगी असेल.
 • ग्राहकांना शक्यतो मास्क, ग्लोव्ह्ज आणि इंन्स्टन्ट हँटवॉश आणण्याचा आग्रह करावा.
 • प्रत्येक ग्राहकासाठी सॅनिटायझरची सोय करण्यात यावी.
 • पैसे स्वीकारण्यासाठी जास्तीतजास्त डिजिटल पद्धतीचा वापर करण्यात यावा.
 • पैसे स्वीकारणाऱ्या व्यक्तीनं सातत्यानं सॅनिटायझरचा वापर करावा.
 • शौचालय किंवा हात धुण्याच्या जागेची वारंवार पडताळणी करण्यात यावी. त्या ठिकाणी कायम स्वच्छता ठेवावी.
 • कर्मचारी आणि ग्राहक यांच्या शक्यतो कमी संपर्क असावा.
 • सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित असावे.
 • मुंबई हॉटेल उपहारगृहं सुरू झाल्यानंतर जाण्यापूर्वी आपली नोंदणी करणं आवश्यक असेल.
 • ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश नाकारण्यात यावा.
 • दोन टेबलांमध्ये सुरक्षित अंतर असावं.
 • टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता होणं आवश्यक आहे.
 • कर्मचाऱ्यांचीही वेळोवेळी वैद्यकीय तपासणी अथवा करोनाची चाचणी करणं आवश्यक असेल. गरज भासल्यास करोनाच्या मदत संपर्क केंद्रावर संपर्क साधावा.
 • बसण्यापूर्वी टेबलवर कोणत्याही प्लेट, ग्लास, मेन्यू कार्ड, टेबल टॉबल टॉप अथवा कोणत्याही वस्तू असू नयेत. कापडाच्या नॅपकिन ऐवजी विघटनशील कपड्याचा वापर करावा.
 • क्युआर कोडच्या स्वरूपात मेन्यू कार्ड देण्याचा प्रयत्न करावा.
 • सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी जमिनीवरही खुणा करण्यात याव्यात.
 • शक्यतो एसीचा वापर टाळावा. आवश्यकता असल्यास सतत त्यांची सफाई करत राहावी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 8:24 pm

Web Title: hotel restaurants bar new sop declared maharashtra government covid 19 situation jud 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 परतीच्या पावसाने बळीराजाच्या डोळ्यात आणलं पाणी
2 मराठा आरक्षण : बीडमधील ‘त्या’ तरूणाची सुसाइड नोट बनावट, गुन्हा दाखल
3 हाथरस प्रकरणावरून प्रियंका चतुर्वेदींचा कंगनावर निशाणा, म्हणाल्या…
Just Now!
X