राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेस पक्षाकडून परळीचे प्रा. टी. पी. मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येते, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही रमेश आडसकर यांच्या नावावर चर्चा सुरू असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवानंतर दोन्ही काँग्रेसने जिल्हय़ात पुन्हा लक्ष केंद्रित केल्याचे दिसते.
बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने सत्तेची सगळी ताकद पणाला लावूनही भाजपचे गोपीनाथ मुंडे जवळपास दीड लाख मतांनी विजयी झाले. विधानसभेच्या सर्वच मतदारसंघांत मुंडेंना मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. विधानसभेच्या सहा मतदारसंघांपकी मागच्या वेळी ऐन वेळेला परळी मतदारसंघ राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडला. इतर ५ मतदारसंघ मात्र आपल्याकडे ठेवले. परळीतून काँग्रेसचे प्रा. टी. पी. मुंडे सातत्याने केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांना विरोध करतात. मात्र, स्थापनेपासून राष्ट्रवादीत असतानाही प्रा. मुंडेंना अपेक्षित ताकद मिळाली नाही. परिणामी प्रा. मुंडे यांनी परत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मागच्या वेळी विधानसभेची निवडणूकही लढवली.
या पाश्र्वभूमीवर राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी काँग्रेसच्या कोटय़ातील सहा जागांबाबत नवी दिल्लीत चर्चा सुरू आहे. त्यात प्रा. टी. पी. मुंडे यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीकडूनही जिल्हय़ातील रमेश आडसकर यांची चर्चा सुरू आहे. माजी आमदार बाबूराव आडसकर यांचे ते चिरंजीव. मागील वेळी मुंडेंच्या विरोधात आडसकर यांनी सव्वापाच लाख मते घेतली होती. पण मध्यंतरीच्या काळात शब्द देऊनही पक्षनेत्यांनी आमदार करण्यास दुर्लक्ष केले. या वेळी मात्र आडसकर यांना संधी दिली जावी, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावून धरली आहे. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरही त्यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.