रत्नागिरी जिल्हा करोनामुक्त करण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत गृहभेटीद्वारे १४ लाख २२ हजार २१३ लोकांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी आणि शरीराच्या तापमानाची तपासणी केली जाणार आहे.

सुमारे महिनाभर चालणाऱ्या या खास मोहिमेसाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागासह जिल्हा शासकीय रुग्णालय मिळून ५६४ पथके तयार केली आहेत.

विविध प्रकारे प्रय करूनही राज्यातील करोनाबाधित रुग्णांची वाढ आटोक्यात येऊ शकलेली नाही. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राज्यभर राबवली जात आहे. शहर, गाव, वस्त्या, तांडे इत्यादी कोणत्याही ठिकाणी असलेल्या प्रत्येकाची आरोग्य तपासणी, अतितीव्र स्वरुपाचे आजार असल्यास उपचार आणि आरोग्य शिक्षण या मोहिमेअंतर्गत करण्यात येणार आहे. १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या राबवल्या जाणाऱ्या या मोहिमेसाठी एकूण ५६४ पथके तयार केली जात असून प्रत्येक पथकामध्ये १ आरोग्य कर्मचारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेले २ स्वयंसेवक राहणार आहेत. या पथकाने दररोज ५० घरांना भेट देऊन प्रत्येक घरातील सदस्यांना ताप, खोकला, दम लागणे यासारखी करोनासदृश लक्षणे आहेत का, याची तपासणी करणे, अत्यावश्यक वाटल्यास चाचणी करून पुढील उपचारासाठी पाठवणे अपेक्षित आहे आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४ लाख २७ हजार ७७३ कुटुंबे असून लोकसंख्या १४ लाख २२ हजार आहे.

त्यांच्या तपासणीसाठी ग्रामीण भागात ४९२, तर शहरात ७२ पथके नियुक्त केली जाणार आहेत. प्रत्येक घरातील सदस्यांच्या सर्वसाधारण तपासणीबरोबरच या पथकाकडून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारखे आजार असलेले रुग्ण नियमित उपचार घेतात का, याची खात्री करून घेऊन आवश्यक तेथे औषधेही पुरवण्यात येतील. प्रत्येक १० पथकामागे १ डॉक्टर उपलब्ध ठेवण्यात येणार आहे.

लोकसंख्येनुसार प्राथमिक आरोग्य केंद्रात ही आरोग्य पथके नियुक्त केली आहेत.

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदय विकार, मूत्रपिंड विकार यांसारख्या आजारांसाठी लागणाऱ्या औषधांचा साठा आरोग्य केंद्रात उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच  प्रत्येक तालुक्यात १ ताप उपचार केंद्र सुरू करण्यात येणार आहे.