डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून सलग अकराव्या वर्षी ‘गृहिणी महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ७, ८ व ९ मार्च रोजी संभाजीनगर येथे हा महोत्सव होणार आहे. ७ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता महोत्सवाचे उद्घाटन तर ९ रोजी सायंकाळी ७ वाजता विविध स्पर्धाचे बक्षीस समारंभ वितरण व गृहिणी गौरव पुरस्कारांचे वितरण होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त प्रतिमा सतेज पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.    
बचतगटातील महिलांनी बनवलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी व महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गृहिणी महोत्सवाचे दरवर्षी आयोजन केले जाते. महोत्सवाचे हे ११वे वर्ष असून संपूर्ण जिल्हय़ातील सुमारे २०० बचतगटांनी यासाठी अर्ज केले आहेत. ट्रस्टच्या वतीने सहभागी होणाऱ्या महिला बचतगटांना मोफत स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत.   
महिलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी या तीन दिवसांच्या काळात महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धासाठी प्रवेश विनामूल्य असून विजयी स्पर्धकांना रोख बक्षिसांबरोबरच स्मृतिचिन्हही देण्यात येणार आहे. ७ मार्च रोजी महिलांसाठी भुशाची रांगोळी (गालिचा) स्पर्धा, निबंध स्पर्धा होणार आहेत. ८ मार्च रोजी इंधनाशिवाय खाद्यपदार्थ स्पर्धा, लहान मुलांसाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा, मिसेस गृहिणी स्पर्धा होणार आहे. ९ मार्च रोजी ग्रामीण व शहरी महिलांसाठी झिम्मा व उखाणे स्पर्धा होणार आहे.यामध्ये अष्टपैलू महिलेस ‘गृहिणी पैठणी’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेदरम्यान ‘वन मिनिट शो’सुद्धा होणार आहे. मुंबईतील शंकरा संस्थेच्या वतीने ‘रानजाई गं.’ स्त्रीभ्रूणहत्या प्रबोधनपर नाटिकेचे सादरीकरण करण्यात येणार आहे. सायंकाळी सात वाजता मिसेस गृहिणी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. या विविध स्पर्धातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे दिली जाणार आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने कला, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘गृहिणी गौरव’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.     
‘मिसेस गृहिणी’ हा किताब मिळविणाऱ्या महिलेस हीरो होंडा प्लेजर ही दुचाकी भेट देण्यात येणार आहे. लकी ड्रॉद्वारे निवडलेल्या भाग्यवान महिलेस स्कूटी पेप ही दुचाकी भेट देण्यात येणार आहे. महोत्सवांतर्गत दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी लाभणार आहे. ७ मार्च रोजी ‘लावण्यसंध्या’ (घरंदाज लोकसंगीताचा उत्सव) हा लोकगीतांचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.  
८ मार्च रोजी कमलाकर सातपुते,आशिष पवार, मीरा मोडक या टीव्हीवरील कलाकारांचा ‘कॉमेडी एक्सप्रेस’ तसेच ९ मार्च रोजी दीपक बिडकर यांचा रुद्राक्ष अॅकॅडमीचा कार्यक्रम होणार आहे.