देशात पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. तर डिझेलचही शंभरच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. त्यामुळे भाजपा विरोधी पक्षाने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केंद्रातील मोदी सरकावर निशाणा साधला आहे. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना केलेल्या ट्विटचा दाखला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जुनं ट्विट पोस्ट करत त्यावर मिश्किल भाषेत टीका केली आहे.

“पेट्रोल डिझेलच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. काँग्रेसप्रणित युपीए सरकार अपयशी ठरल्याचं प्राथमिक उदाहरण आहे. यामुळे गुजरातमधील नागरिकांवर भार पडणार आहे. संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी असा निर्णय घेणं संसदेच्या सन्मानाला शोभत नाही”, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. याच ट्वीटचा दाखला देत जितेंद्र आव्हाड यांनी रिट्वीट केलं आहे. “आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे ट्वीट केलं होतं. तेव्हा ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. आता पेट्रोलच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. आठवण करून देतो” असं ट्वीट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जुनं ट्विट पुन्हा चर्चेत आलं आहे. हे ट्विट ९ वर्षांपूर्वीचे म्हणजेच २०१२ सालातील आहे. २३ मे २०१२ रोजी त्यांनी हे ट्वीट केलं होतं. मोदी गुजरातचे पंतप्रधान असताना त्यांनी पेट्रोल दरवाढीवरुन तत्कालीन केंद्र सरकारला धारेवर धऱलं होतं. पेट्रोल दरवाढीमुळे गुजरातवर मोठा आर्थिक भार पडेल असं मोदींनी म्हटलं होतं. अशाप्रकारे मोदींचं ट्विट व्हायरल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच केलेल्या वक्तव्यांच्या व्हिडीओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत.