दिवसेंदिवस वाढत असलेला करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, तरीही नागपूरमध्ये सोमवारी लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसून आले. याची गंभीर दखल घेत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने वाहतूक रोखण्याबरोबरच सोशल डिस्टंसिंग ठेवण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले.

नागपूरमध्ये रुग्णालयातून चार करोनाबाधित रुग्ण पळून गेले होते. याची गंभीर दखल घेत खंडपीठाने जनहित याचिका दाखल करुन घेत यावर उत्तर देण्याचे आदेश संबंधीत प्रशासनाला दिले होते. त्यावर सोमवारी सुनावणी घेण्यात आली. यावेळी कोर्टात अॅड. भानुदास कुलकर्णी यांनी नागपूर शहरात लोक रस्त्यावर फिरत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच राज्यभर लॉकडाऊन असताना आणि घरातूनच काम करण्याचे आदेश असतानाही लोकांची रस्त्यांवर गर्दी दिसून येत असल्याचे तसेच पोलिसही त्यांना अडवत नसल्याचे त्यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

आणखी वाचा- लॉकडाउनचे उल्लंघन केल्यास होऊ शकतो सहा महिने तुरुंगवास

यानंतर न्या. सुनील शुक्रे आणि न्या. अविनाश घरोटे यांच्या खंडपीठाने जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढत विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले.