16 December 2017

News Flash

ग्रामीण भागातही स्फोटके सहज मिळतात कशी?

काळेगावघाट येथील रेडिओ स्फोटाचा प्रकार वैयक्तिक वैरभावातून घडवल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

बीड/वार्ताहर | Updated: December 5, 2012 6:14 AM

काळेगावघाट येथील रेडिओ स्फोटाचा प्रकार वैयक्तिक वैरभावातून घडवल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, एका खेडेगावातील अल्पशिक्षित व्यक्तीने अत्यंत चाणाक्षपणे रेडिओमध्ये डिटोनेटरचा वापर केला. या प्रकारामुळे जिल्हय़ात डिटोनेटर व जिलेटीन सहज उपलब्ध होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.
जिल्हय़ात दहा व्यक्तींच्या नावे सोळा परवाने आहेत. या परवानाधारकांच्या कागदपत्रांची व गोदामांची दर महिन्याला तपासणी करणे बंधनकारक असले तरी वर्षांनुवर्षे तपासणीच होत नाही. ट्रॅक्टरद्वारे स्फोट करण्याचा एकही परवाना नसताना विहिरींच्या खोदकामासाठी मात्र राजरोस याचा वापर केला जातो, हेही उघड सत्य आहे. काळेगावघाट रेडिओ स्फोटानंतर राज्य, देश पातळीवरील पोलीस यंत्रणांनी तपास करून घटनेतील मुख्य आरोपीला अटक केली. हा स्फोट अतिरेकी कारवाई नसून वैयक्तिक वैरभावातून घडल्याचे उघड झाल्याने सर्वच पोलीस यंत्रणांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. मात्र, या घटनेने अंबाजोगाई तालुक्यातील केंद्रेवाडी या खेडय़ातील अल्पशिक्षित मुंजाबा गिरी या व्यक्तीने डिटोनेटर सहज उपलब्ध होते, हेही दाखवून दिल्याचे समोर आले आहे. गोळय़ा, बिस्किटे घ्यावीत इतक्या सहजतेने ही स्फोटके उपलब्ध होतात. अनेक ठिकाणी कोणताही परवाना न घेता खदाणी व विहिरी खोदताना या स्फोटकांचा राजरोस वापर केला जातो. जिल्हय़ात जिलेटीन व डिटोनेटर विक्रीस ठेवण्याचे मर्यादित परवाने आहेत. दहा व्यक्तींच्या नावे १६ परवाने सध्या सुरू आहेत. दर दोन परवानाधारकांनी स्वत:हून आपला व्यवसाय बंद केला आहे.
स्फोटक पदार्थ ठेवण्यासाठीचा हा परवाना सहमुख्य नियंत्रक स्फोटके नागपूर यांच्या कार्यालयामार्फत दिला जातो. मात्र, परवानाधारक व्यक्तीने याची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करणे गरजेचे असते. पोलिसांनी महिन्यातून किमान एकदा या स्थळाची पाहणी करावी, असे निर्देश आहेत. मात्र, पोलिसांकडे असलेल्या कामाच्या व्यापातून हा विषय कायम दुर्लक्षित राहिला आहे. पोलिसांनी सरकारला सादर केलेल्या माहितीवरून दहिवंडी येथील एका परवानाधारकाची शेवटची तपासणी जुलै महिन्यात, तर शिरूर व हिवरसिंगा येथील परवान्यांची तपासणीही याच महिन्यात करण्यात आली. वेगवेगळय़ा अधिकाऱ्यांनी हे परवाने ९ जुलै रोजीच तपासल्याचीही नोंद आहे. बीड तालुक्यातील एक परवाना सप्टेंबर महिन्यात तपासण्यात आला. इतर परवान्यांची तर वर्षांनुवर्षे तपासणीच नाही.
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर मागील महिन्यात पोलिसांनी या परवानाधारकांच्या गोदामांची तपासणी केल्याचे सांगितले जाते. पण तपासणीत परवानाधारकाचे स्टॉक रजिस्टर, स्फोटके कोणाला विकली हे पाहणे अपेक्षित असते. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडत नाही. जिल्हय़ात ट्रॅक्टरद्वारे स्फोट करण्याचा एकही परवाना नाही. मात्र, विहिरी व खदाणी खोदण्यासाठी या ट्रॅक्टरचा सर्रास वापर केला जातो हे उघड सत्य आहे. पोलिसांचेच नियंत्रण नसल्यामुळे सहजपणे ही स्फोटके कोणालाही उपलब्ध होतात हेच या घटनेतून पुढे आले आहे.

First Published on December 5, 2012 6:14 am

Web Title: how does people have acces to explosions in villages
टॅग Explosions