पाच वर्षांत उच्च शिक्षणातील विद्यार्थ्यांची नोंदणी ३० टक्के असावी, असे धोरण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे असले तरी अद्यापही देशात अशी स्थिती नाही. महाविद्यालयांची अवस्था आणि  संख्या हे दोन निकष उच्च शिक्षणाला परिणामकारक ठरतात. महाविद्यालयांची संख्या अधिक असेल तर विद्यार्थ्यांना पर्यायही अधिक उपलब्ध असतात व त्यामुळे गुणवत्ता राखली जाते. कारण महाविद्यालयांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्याची स्पर्धा असते. मात्र, त्याच वेळी महाविद्यालयांची संख्या कमी असेल आणि सहज शिक्षण घेता येत नसेल तर साहजिकच गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे अडचणीचे ठरते.

ऑल इंडिया हायर एज्युकेशन सर्वे (एआयएचईएस)नुसार महाविद्यालयांची संख्या पाहिल्यास देशातील १४० जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये १० पेक्षाही कमी महाविद्यालये आहेत.  तीन जिल्ह्य़ात ३०० ते ३९९, ४ जिल्ह्य़ांमध्ये ४०० ते ४९९ तर दोनच जिल्ह्य़ांमध्ये ५०० ते ९९९ महाविद्यालये आहेत. देशातील वेगवेगळ्या जिल्ह्य़ातील महाविद्यालयांच्या संख्येत फारच तफावत दिसून येते. जिल्ह्य़ांचे वर्गीकरण हे तेथे असलेल्या महाविद्यालयांच्या संख्येवरून करण्यात आले आहे.महाविद्यालयांचे जाळे हवे तितके पसरलेले नाही, ही एकीकडे स्थिती असताना दुसरीकडे आहे त्या महाविद्यालयांची अवस्था चांगली नाही. अनेक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प असून पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

जिल्हा किंवा शहरांमध्ये महाविद्यालये असणे आणि त्या ठिकाणी प्रवेश घेता येणे हे उच्च शिक्षणातील टक्का वाढवण्याच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा निकष आहे. एक गोष्ट खरोखर चांगली आहे. ती म्हणजे देशातील ६० टक्के महाविद्यालये ग्रामीण भागात विखुरलेली असणे ही होय. तसेच ११.१ टक्के महाविद्यालये पूर्णत: मुलींसाठी आहेत. देशातील ४० टक्के महाविद्यालये असे आहेत की ज्या ठिकाणी केवळ पदवीचे शिक्षण दिले जाते आणि अशी महाविद्यालये प्रामुख्याने खासगी व्यवस्थापनांच्या हाती आहेत. यातील ३० टक्के महाविद्यालये फक्त बी.एड्. अभ्यासक्रम चालवतात. १.७ टक्के महाविद्यालये पीएच.डी.स्तरीय अभ्यासक्रम चालवतात तर ३३ टक्के पदव्युत्तर शिक्षण देतात.

सर्वाधिक महाविद्यालये उत्तर प्रदेशात

भारतात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि मध्य प्रदेश ही सर्वाधिक महाविद्यालये असलेली राज्ये आहेत. या राज्यात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या एक लाख विद्यार्थ्यांमध्ये २८ महाविद्यालये असे गुणोत्तर आहे. सर्वाधिक महाविद्यालये उत्तर प्रदेशात ६,४९१ एवढी आहेत. त्या ठिकाणी एका लाख विद्यार्थ्यांमागे २६ महाविद्यालये आहेत. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून येथे ४,५६९ महाविद्यालये आहेत. येथे उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या १ लाख मुलांमागे ३४ महाविद्यालये आहेत. कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकात एकूण महाविद्यालये ३,५५५ एवढी असून एका लाख विद्यार्थ्यांमागे ५० महाविद्यालये आहेत.

शंभर पेक्षा कमी विद्यार्थी संख्या

जास्तीत जास्त महाविद्यालये विद्यार्थी नोंदणीच्या तुलनेत छोटी आहेत. २२ टक्के महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या १०० पेक्षाही कमी आहे. तर ४०.७ टक्के महाविद्यालयांमध्ये १०० ते ५००च्या दरम्यान विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले आहेत. म्हणजे ६२.७ टक्के महाविद्यालयांमध्ये नोंदणी ५००च्या आत आहेत. केवळ ४.३ टक्के महाविद्यालयांमध्ये ३०००च्यावर विद्यार्थ्यांची नोंदणी आहे.

बंगळूरुमध्ये सर्वाधिक महाविद्यालये

बंगळूरुमध्ये सर्वाधिक (९७०)महाविद्यालये आहेत. त्यापाठोपाठ जयपूर (६१६), हैदराबाद (४९९), नागपूर (४४५), रंगारेड्डी (४३८), मुंबई (३३४), अलाहाबाद (३१०), नालगोंडा (३००) आणि गुंतूरचा (२९६) क्रम आहे.