शेक्सपिअरची ३७ नाटके, पण त्यात ओळी किती? ७३ वर्षांच्या प्रभाकरराव देशपांडे यांच्याकडे यासह अशा सर्व बाबींची नोंद आहे. जगविख्यात नाटककार तिकडे लिहित होता, तेव्हा मराठी मुलखात काय चालले होते? देशपांडे सांगतात, एकनाथमहाराज ज्ञानेश्वरीची प्रत शुद्ध करीत होते.. शेक्सपिअरच्या अशा अनेक गोष्टींसह त्यांच्या नाटकाचा कथानुवाद सोप्या पद्धतीने केलेल्या या ‘ शेक्सपिअर’वेडय़ा माणसाचे साडेबाराशे पानांचे पाच खंड जागतिक ग्रंथदिनी (२३ एप्रिल) प्रकाशित होत आहेत.  शेक्सपिअरने झपाटलेल्या परभणीच्या देशपांडे यांनी काय नाही जमविले? नाटकातील म्हणींपासून ते पात्रांचे गाजलेले संवादही त्यांना तोंडपाठ आहेत.
देशपांडे यांची अख्खी कारकीर्द गेली पशुसंवर्धन विभागात. मात्र, इंग्रजीतून कला विषयाची पदवी घेताना त्यांनी अभ्यासलेली दोन नाटके त्यांना अस्वस्थ करीत होती. र्मचट ऑफ व्हेनिस, मॅकबेथ आणि अन्य चार नाटके अभ्यासली. पुढे एक कथा लिहिली व नंतर जनशक्ती वाचक चळवळीच्या श्रीकांत उमरीकर यांनी  शेक्सपिअरचा पूर्ण अभ्यासच करा, असा आग्रह धरला. एक एक नाटक ते वाचू लागले. शेजारी डिक्शनरी असे. प्रत्येक शब्दाचा अर्थ नव्याने तपासायचा. बाजूला टिपणे काढायची. पहिला खंड ७ शोकांतिकांचा होता. पुढे त्यांना वाटले, की जीवन नुसती शोकांतिका कशी असेल?  शेक्सपिअर पात्रांतून हाडामांसाचा माणूस उभा करतो. नाटकातील अनेक प्रसंगांत आपण कसे वागलो असतो, असा प्रश्न प्रेक्षकांना पडतो तेव्हा त्याच्या पात्राप्रमाणेच असे उत्तर मिळते. त्यामुळेच तो विश्वविख्यात नाटककार होतो, असे सांगत देशपांडे ‘ शेक्सपिअर’मय होऊन जातात.
नाटककार, लेखक, अभिनेता हे त्याचे गुण सांगताना ‘त्याची लेखन प्रक्रिया कशी असेल,’ असा प्रश्न मध्येच विचारतात आणि ती समोरच्या व्यक्तीला सोप्या भाषेत सांगतात. क्रिएटर आणि क्रिएशन एकात्म होऊन जाते. अंतस्फूर्ती त्या मुशीत असतात. तेथे लिखाणाच्या ज्वालामुखीची खदखद असते, हे त्या कलावंतालाही माहीत नसते. सगळे पूर्ण झाल्यानंतर त्याला कळते, घडून गेले आपल्या हातून.  शेक्सपिअरचे ५ खंडही तसेच घडून गेले, असे सांगताना ग्रंथनिर्मितीच्या चिकित्सक अभ्यासाची पद्धतही ते सांगतात. त्यांना भेटले, की  शेक्सपिअरच्या साहित्याच्या कोणीही अधिक जवळ जाईल. त्यासाठी इंग्रजी आलेच पाहिजे, अशीदेखील अट नाही.

जागतिक ग्रंथदिन विशेष
खंड १ :
*रोमिओ अँड ज्यूलिएट, हॅम्लेट, ऑथेल्लो, किंग लिअर, मॅक्बेथ, ज्यूलियस सिझर, अँटनी अँड क्लिओपात्रा.
खंड २ : सात सुखान्तिका
*अ‍ॅज यू लाईक इट, ट्वेल्थ नाईट, मच अ‍ॅडो अबाऊट निथग, अ मिड समर नाईट्स ड्रीम, द कॉमेडी ऑफ एर्स, टेिमग ऑफ श्ऱ्यू, द र्मचट ऑफ व्हेनिस.
खंड ३ : सात नाटके
*ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, मेझर फॉर मेझर, ट्रॉयलस अ‍ॅड क्रेसिडा, द मेरी वाईव्हज ऑफ िवडसर, लव्हज लेबर्स लॉस्ट, द टू जंटलमन ऑफ व्हेरोन्ना, टायटस अँड्रानिकस
खंड ४ : आठ नाटके
*टायमन ऑफ अथेन्स, कोरिओलेनस, सिंबेलीन, पेरिक्लीज (द प्रिन्स ऑफ टायर), द िवटर्स टेल, द टेम्पेस्ट, किंग जॉन, हेन्री द एड्थ.
खंड ५ : आठ ऐतिहासिक नाटके
*हेन्री द सिक्स्थ १, हेन्री द सिक्स्थ २, हेन्री द सिक्स्थ ३, रिचर्ड द थर्ड, रिचर्ड दि सेकंड, हेन्री द फोर्थ १, हेन्री द फोर्थ २, हेन्री द फिफ्थ.