स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत साताऱ्याचा संघ मैदानात उतरणार आहे. यशवंत सातारा संघाचा एक कार्यक्रम २९ ऑक्टोबर रोजी साताऱ्यातील गोळेश्वर या गावी पार पडला. यावेळी बोलत असताना राजू शेट्टी यांनी, “भलत्या-सलत्यांचा सन्मान केला जातो. सचिनने किती धावा काढल्या व किती मॅचफिक्सींग केलं हे न पाहताच त्याला भारतरत्न दिलं गेलं,” असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ‘सरकारनामा’ या संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

यावेळी बोलत असताना राजू शेट्टी म्हणाले, “खाशाबा जाधवांचा सन्मान करण्यात केंद्र व राज्य सरकार कमी पडले आहे. भलत्या, सलत्यांचा सन्मान केला जातो. सचिन तेंडूलकरने धावा किती काढल्या व किती मॅचफिक्‍सिंग केले, हे न पाहता त्याला भारतरत्न दिला जातो. खाशाबा हे सचिनपेक्षा तसूभरही कमी नव्हते. मात्र केवळ खेड्यातून असल्यामुळे खाशाबांवर अन्याय झाला का सामन्य जनतेच्या मनात प्रश्न आहे. खाशाबा जाधवांना पद्मभूषण मिळवण्यासाठी दहा वर्षांपासून प्रयत्न करत आहे. काँग्रेसच्या काळात तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरंम यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यांनी दोन ओळीच्या पत्रात सांगितले की, हयात नसणाऱ्या व्यक्तीस असला पुरस्कार दिला जात नाही. शासन दरबारी खाशाबा जाधवांच्या सन्मानासाठी लढाई सुरु ठेवणार आहे.”

पेट्रोल पंपावर तेल भरणाऱ्या मुलाला केंद्र सरकार पद्मश्री देते. सचिन तेंडूलकरला भारतरत्न मिळावा, यासाठी मागण्यांचा रेटा उभा राहतो. पण ऑलंपिकमध्ये अनवाणी जाऊन देशाची मान ताठ करणाऱ्या खाशाबा जाधव यांची पद्मभूषणपासून उपेक्षा का, असा सवाल करत जनसामान्यांची भाषा राज्यकर्त्यांना समजत नसेल, तर त्यांच्या मानगुठीला धरुन खाशाबा जाधवांना पद्मभूषण देण्यास भाग पाडू, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.