चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ई निविदा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचा दावा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे यांनी केला आहे. ही ई निविदा पध्दत पारदर्शक असतांनाही सुनील हायटेक या एकाच कंपनीला चार वर्षांत ३० कोटींची ८८ कामे कशी मिळाली, याबाबत वीज केंद्राचे अधिकारी काहीही बोलायला तयार नाहीत.
येथील २३४० मेगाव्ॉट क्षमतेच्या महाऔष्णिक विद्युत केंद्रात २०१० ते २०१४ या चार वर्षांत ३० कोटींची ८८ कामे सुनील हायटेक या एकाच कंपनीला देण्यात आलेली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र, ई निविदा प्रक्रिया पूर्णत: पारदर्शक असल्याचा दावा वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे यांनी येथे प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकातून केला आहे. चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रात एकूण सात संच आहेत. २१० मेगाव्ॉटचे चार, व ५०० मेगाव्ॉटचे तीन आहेत. या संचाच्या दुरुस्ती व संचलनाकरिता वेगवेगळे विभाग आहेत. संचलन व दुरुस्तीकरिता लागणारी यंत्रसामुग्री, सुटे भाग व दुरुस्तीकरिता, नियमित कामांकरिता विभागांच्या आवश्यकतेनुसार निविदा प्रकाशित करणे व आदेश देण्यापर्यंतची प्रक्रिया महानिर्मितीच्या मुख्य कार्यालयाने जारी केलेल्या नवीन खरेदी व विविध प्रकारची कामे, खरेदी प्रणाली व केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार करण्यात येते. वेगवेगळ्या विभागातर्फे नवीन साहित्य व कामे खुल्या ई-निविदाव्दारे काढली जातात. या कामांची जाहिरात वर्तमानपत्रांमधून प्रकाशित केली जाते. ई निविदा उघडल्यानंतर अर्हतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाचा अनुभव असलेल्या व कमीतकमी दर देत असेल, अशा पुरवठादार, कंत्राटदार कामाचा आदेश देण्याअगोदर, हा आदेश लेखा विभागाकडून अंकेक्षित करून घेतला जातो. त्यानंतरच कंत्राटदाराला कामाचा आदेश देण्यात येतो. खुल्या ई-निविदा व प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी महाजनकोच्या सेट्स प्रणालीमध्ये नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. असे सर्वच पुरवठादार व कंत्राटदार हे ई-निविदामध्ये सहभाग घेऊ शकतात. त्यामुळे ई-निविदा प्रक्रिया ही पूर्णत: पारदर्शक असल्याचे मुख्य अभियंता बुरडे यांनी म्हटले आहे. ही वस्तुस्थिती असली तरी चार वर्षांत केवळ सुनील हायटेक या एकाच कंपनीला ३० कोटींची तब्बल ८८ कामे कशी दिली गेली, याबाबत वीज केंद्राच्या अधिकाऱ्यांकडे उत्तर नाही.