सोलापूर : सध्या सुरू असलेल्या बारावी परीक्षेचा पेपर देण्यासाठी निघालेल्या एका विद्यार्थ्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला, तर अन्य एका परीक्षार्थीसह दोघे जण जखमी झाले. सोलापूर-पुणे महामार्गावर मोहोळ येथे सकाळी एका अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ही दुर्घटना घडली. मोहोळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सौरभ दशरथ वाघ (वय १८, रा. वाफळे, ता. मोहोळ) असे दुर्दैवी मृत परीक्षार्थीचे नाव आहे. तर स्वप्नील ज्ञानेश्वर चव्हाण (वय १८, रा. नेमतवाडी, ता. मोहोळ) व दत्तात्रेय दगडू घोरपडे (वय ५५, रा. मोहोळ) अशी जखमींची नावे आहेत. मृत सौरभ व जखमी स्वप्नील हे दोघे यंदा बारावीची परीक्षा देत होते. त्यांचे परीक्षा केंद्र मोहोळ येथील नागनाथ विद्यालयात होते. त्यानुसार सकाळी साडेनऊच्या सुमारास सौरभ व स्वप्नील हे दोघे आपल्या दुचाकीवर (एमएच १३ सीडब्ल्यू १०५३) बसून मोहोळकडे निघाले होते. तेव्हा मोहोळजवळ त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका अज्ञात वाहनाने ठोकरले. यात सौरभ वाघ हा गंभीर जखमी होऊन जागीेच मरण पावला, तर त्याचा सहकारी स्वप्नील चव्हाण हा किरकोळ जखमी झाला. या अपघातात धडक बसलेल्या दुचाकीचा धक्का तेथून बाजूनेच जाणाऱ्या दत्तात्रेय घोरपडे या सायकलस्वाराला बसला आणि त्यांनाही दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर संबंधित अज्ञात वाहनचालकाने अपघातस्थळी न थांबता आणि जखमींना मदत न करता तशाच सुसाट वेगाने पलायन केले. मृत सौरभ याचे चुलते भागवत गोरख वाघ यांनी यासंदर्भात दिलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलीस ठाण्यात संबंधित अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.