News Flash

बारावीच्या परीक्षांबाबत अजूनही निर्णय नाहीच! मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेवर शिक्षणमंत्री म्हणतात…!

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे.

संग्रहीत

केंद्र सरकारने CBSE च्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर गुजराज, हरयाणा आणि मध्यप्रदेश या राज्यांनी देखील आपापल्या राज्य बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत राज्य सरकार नेमका काय निर्णय घेणार? याची चर्चा सुरू झाली होती. त्यासंदर्भात सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये त्यासंदर्भात निर्णय होईल अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, त्यावर आजही निर्णय न झाल्याचं स्पष्ट झालं आहे. मंत्रिमडळात आज बारावीच्या परीक्षांबाबत झालेल्या चर्चेची माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत यावर स्पष्टीकरण केलं आहे.

आता निर्णय आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे!

“शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही फाईल पाठवत आहोत. आज किंवा उद्या त्यांची बैठक होईल. त्यात ते फाईलवर निर्णय घेतील आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला अतिरिक्त माहिती देऊ. सध्याच्या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व निर्णय हे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून घेतले जात आहेत. त्यानुसार आम्ही ती फाईल त्यांच्याकडे पाठवली आहे”, असं वर्षा गायकवाड यांनी यावेळी सांगितलं.

केंद्रानं CBSE च्या परीक्षा रद्द करताच महाराष्ट्रातील बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षणमंत्र्यांचं महत्त्वपूर्ण विधान!

“विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची भूमिका!”

“करोनाच्या परिस्थितीमध्ये १२वीची परीक्षा २३ एप्रिलला होणार होती. ती आम्ही मे अखेरपर्यंत पुढे ढकलली. त्यानंतर देखील करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीत ती पुन्हा पुढे ढकलली. केंद्रानं मंगळवारी सीबीएसईची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या भूमिकांमध्ये सूसूत्रता असायला हवी असं म्हटलं होतं. या सर्व बाबींविषयी मंत्रिमंडळाला आज अवगत करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच राज्य सरकारची भूमिका राहिली आहे. आता आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतर त्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल”, असं देखील शिक्षणमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

विद्यार्थ्यांवर सक्ती नको – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दरम्यान, याआधी मंगळवारी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये CBSE बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा मोठा निर्णय जाहीर केला. दहावीच्या परीक्षा याआधीच रद्द करण्यात आल्या आहेत. देशात निर्माण झालेल्या करोनाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा देखील करोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याची मागणी केली जात होती. करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भिती देखील वर्तवली जात होती. या पार्श्वभूमीवर अखेर पंतप्रधानांनी घेतलेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. “विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि त्यांची सुरक्षा याला सर्वाधिक प्राधान्य असेल. त्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये परीक्षेसंदर्भात निर्माण झालेला तणाव संपुष्टात यायला हवा. अशा प्रकारच्या तणावपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची सक्ती केली जाऊ नये. सर्व संबंधितांनी या गोष्टीकडे विद्यार्थ्यांसाठी संवेदनशीलतेने पाहायला हवे”, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडली आहे.

वेळापत्रक जाहीर केल्यानंतर २४ तासातच १२वीच्या परीक्षा रद्द! गुजरात बोर्डाचा निर्णय!

या सर्व पार्श्वभूमीवर आता राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेतं, आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आलेला प्रस्ताव मान्य होणार का? नेमका निर्णय कधी जाहीर केला जाणार? याविषयी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये देखील संभ्रम आणि चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2021 5:27 pm

Web Title: hsc exams in maharashtra cancelled varsha gaikwad clarifies about cabinet decision pmw 88
Next Stories
1 VIDEO: ‘दृष्टी’ आणि ‘कोन’मध्ये आज प्रकाश आंबेडकर; पहा YouTube वर
2 राज्यात ‘करोनामुक्त गाव’ स्पर्धा; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची घोषणा
3 तुमचं गावही होऊ शकतं मालामाल! जाणून घ्या ‘करोनामुक्त गाव स्पर्धे’ची पूर्ण माहिती
Just Now!
X