News Flash

हुबळी स्फोट : रेल्वेतून आलेल्या ‘त्या’ पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव

आमदार प्रकाश आबिटकरांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट

हुबळी येथील रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोट झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली होती. अमरावती एक्स्प्रेसमध्ये सापडलेलं बेवारस पार्सल उघडताना हा स्फोट झाला होता. या घटनेत एक व्यापारी जखमी झाला होता. दरम्यान, एक्स्प्रेसमध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या या पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव असल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

विजयवाड्याहून हुबळीला आलेल्या अमरावती एक्स्प्रेसमध्ये सोमवारी बकेट स्वरूपातील एक पार्सल आढळून आलं होतं. या बकेटमध्ये नऊ छोटे बॉम्ब पाठवण्यात आले होते. हे बेवारस पार्सल सापडल्यानंतर याबाबतची माहिती स्टेशनमास्तरांना देण्यात आली. त्यानंतर पार्सल तातडीने रेल्वेतून बाहेर काढण्यात आले. रेल्वे पोलिसाने बेवारस पार्सल ताब्यात घेतल्यानंतर ते प्लॅटफॉर्मवर खाद्यपदार्थ विक्री करणार्‍या हुसेनसाबला उघडण्यास सांगितले; पण पार्सल उघडताच एका छोट्या बॉम्बचा स्फोट झाला. यामध्ये हुसेनसाबच्या हाताला गंभीर दुखापत झाली, तर स्फोटाच्या तीव्रतेने स्टेशनमास्तरांच्या कार्यालयाच्या काचा फुटल्या. या स्फोटानंतर श्‍वानपथक, स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, या स्फोटामुळे स्थानकावर प्रचंड गोंधळ उडाला होता.

याप्रकरणाची पोलिसांनी चौकशी सुरू केल्यानंतर त्या बेवारस पार्सलवर शिवसेनेचे राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांचे नाव असल्याचं उघड झालं आहे. या पार्सलवर ‘प्रकाश आबिटकर, आमदार राधानगरी-भुदरगड, गारगोटी कोल्हापूर,’ असा पत्ता लिहिलेला आहे. तसेच ‘नो बीजेपी, नो आर.एस.एस. ओन्ली शिवसेना’ असाही मजकूर लिहिल्याचे आढळले आहे.

पार्सलमधील बॉम्ब नेमके कशासाठी

छोट्या चौकोनी प्लास्टिकच्या डब्यांमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती. त्यात भुसा आणि लिंबूसारखी वस्तू होती. डबा उघडताना हुसेनसाबने त्यावर दाब दिला आणि त्याचा स्फोट झाला, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पार्सलमधील एक डबा फुटला तर उर्वरित आठ डबे रेल्वे स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील खुल्या जागेत ठेवण्यात आले. हे बॉम्ब निकामी करण्यासाठी बंगळूरहून बॉम्ब निकामी पथकाला पाचारण करण्यात आले असून, ही स्फोटके रानडुकरांना मारण्यासाठी वापरण्यात येतात, अशी प्राथमिक माहिती आहे. याचा आकार फळ किंवा खाद्यपदार्थासारखा बनवण्यात येतो. जेणेकरून रानडुक्‍कर त्याकडे आकर्षित होते आणि तोंडात धरताच त्याचा स्फोट होतो.

व्हिडीओ येथे पहा –

बदनामी करण्याचा प्रयत्न -आमदार प्रकाश आबिटकर

या घटनेसंदर्भात प्रकाश आबिटकर यांनी या पार्सलशी कोणताही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. या पार्सलशी माझा कोणताही संबध नाही. माझं नाव कशामुळं आलं हा मलाच प्रश्न पडला आहे. यासंदर्भात कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांची भेट घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून या घटनेमागील सूत्रधाराचा काय उद्देश आहे, ते समोर आणावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे,”असं ते म्हणाले. राजकीय क्षेत्रात काम करत असल्यानं अशा घटनांशी दुरान्वयानेही संबंध येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 5:01 pm

Web Title: hubli blast parcel was addressed to shiv sena mla bmh 90
Next Stories
1 राज्यात युतीला २५० जागांवर विजय मिळेल -चंद्रकांत पाटील
2 रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले काळाच्या पडद्याआड
3 ज्योतिरादित्य शिंदे यांचा तरुणाईशी संवाद; ऋतुराज पाटीलला साथ देण्याचे आवाहन
Just Now!
X