‘बँक ऑफ महाराष्ट्र’ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खात्यात गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम देणग्यांच्या रुपात जमा झाली. या देणग्यांच्या स्रोतांचे स्पष्टीकरण देण्याबाबत प्राप्तिकर विभागाने पक्षाला नोटीस बजावली आहे.
‘संडे एक्स्प्रेस’ने जाहीर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे प्राप्तिकर विभागाच्या अन्वेषण पथकाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देणग्यांच्या स्त्रोतांबद्दल स्पष्टीकरण देण्याबाबत नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये २ एप्रिल २०१३ ते ९ एप्रिल २०१४ या वर्षभराच्या काळात ‘बँक ऑफ महाराष्ट’मधील पक्षाच्या ६०००३०१६९१९ या खाते क्रमांकावर जमा झालेल्या एकूण ३५ कोटी रकमेचे स्त्रोत कोणते होते? याचे स्पष्टीकरण देण्यात यावे असे नमूद केले आहे.
राजकीय पक्षांना मिळणाऱया देगण्यांच्या बाबतीत पारदर्शकता येण्याची मागणी या नोटीसमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. राजकीय पक्ष देणग्यांबाबतीत नियमांचा कायदेशीर फायदा घेत असल्याचेही सामाजिक कार्यकर्त्यांनी याआधी निदर्शनास आणून दिले होते.
सध्याच्या नियमांनुसार, राजकीय पक्षाला केवळ आपल्या २०,००० रुपयांवरील देणगीदारांचीच माहिती द्यावी लागते.
पक्षाला मिळणाऱया देणगीबाबत निवडणूक आयोगाच्या फॉर्म क्रमांक २४अ अंतर्गत राजकीय पक्षाला जाहीर कराव्या लागणाऱया माहितीत सर्व देणगीदारांची नावे नमूद करावी लागतात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या देगणी खात्यांचे आर्थिक व्यवस्थापन पाहणारी यू.जी.देवी या सनदी लेखापाल(चार्टड अकाऊंटट) कंपनीने सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असल्यामुळे संबंधित प्रकरणावर स्पष्टीकरण देण्यासाठी वेळ देण्यात यावा अशी प्राप्तिकर विभागाकडे मागणी केली आहे. तसेच “राज्यातील विविध मतदार संघांतून १०००, ५०० आणि १०० रुपयांच्या पावत्यांच्या माध्यमातून देणग्या स्विकारण्यात येतात. यातील एकही देणगीदार २०,००० रुपयांच्या वरील नसल्याने त्यांची सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही.” असेही या पत्रात म्हटले आहे.
या प्रकरणाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र विभागाचे खजिनदार हेमंत टकले यांना विचारले असता, अद्याप तरी अशाप्रकारची कोणतीही नोटीस मिळाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली नसल्याचे म्हटले आहे.