नीरज राऊत

वर्षांला किमान अडीचशे—तीनशे कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या चिकू फळाचे उत्पादन गेल्या तीन-चार वर्षांत निम्म्यापेक्षा कमीवर येऊन ठेपले आहे. यामागची कारणे शोधण्याचा शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न होत नसल्याने त्यासाठी बागायतदार एकत्रित येऊन त्यावर उपाय शोधण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी ते संघटित झाले असून तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पालघर जिल्ह्यत सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रफळावर चिकूची लागवड असून हेक्टरी १००  झाडांची किमान लागवड आहे. वर्षांला हेक्टरी २५ टन चिकूचे उत्पादन होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चिकू उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. यामागे वातावरणातील बदल, हवेत असलेले तरंगणारे कण पदार्थ (पार्टिक्युलेट मॅटर)चा थर चिकूच्या पानांवर बसत असल्याने तसेच आम्लयुक्त पदार्थामुळे जमिनीवर होणारा परिणाम, प्रदूषण, बुरशीजन्य व अन्य रोग यामुळे उत्पादन कमी होण्यास कारणीभूत ठरत असल्याची शक्यता बागायतदारांकडून व्यक्त होत आहे.

वर्षांला तीनशे कोटीहून अधिक उलाढाल असलेल्या चिकू उत्पादनात होणारी अचानक घट ही चिंता करणारी आहे. चिकू पिकाप्रमाणे याच परिसरात उगविणारा लिम्बडा, उंबर तसेच रानमेवा देणाऱ्या झाडांवर देखील अशाच प्रकारचा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे.

चिकू उत्पादकांनी  वेगवेगळ्या रोगांविषयी अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ व खाजगी प्रयोगशाळेची मदत घेण्यासाठी एकत्रित येऊन विचार सुरू झाले आहेत. हेक्टरी पाचशे रुपये इतका निधी प्रथम संकलित करून या फळपिकाला वाचवण्यासाठी पहिली बैठक १४ सप्टेंबर रोजी डहाणू येथे घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ किंवा अन्य एखाद्या संस्थेच्या छत्रछायेखाली एकत्र येऊन या फळ पिकासाठी शासकीय पातळीवर तसेच समांतर पद्धतीने खाजगी शास्त्रज्ञांची मदत घेण्याच्या येथील शेतकरी विचाराधीन आहेत. सीड बोअरर व बड बोअरर अशा अळीचा प्रादुर्भाव कमी झाला असताना फाइटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाने येथील पिकाला गेल्या काही वर्षांपासून ग्रासले असल्याने चिकूचे उत्पादन झपाटय़ाने घटत असल्याचे येथील बागायतदारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यत चिकूच्या माध्यमातून दहा हजार हेक्टर लागवड होत असताना त्याची कार्बन क्रे डिट घेण्यासाठी देखील प्रयत्न  करण्याचे उद्दिष्ट नव्याने संघटित होऊ पाहणाऱ्या चिकू बागायतदारांचे प्रयो सुरू झाले आहेत.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

गेल्या वर्षी नारळावर आलेल्या स्पायरल वाईट फ्लाय या सफेद माशीचा प्रादुर्भाव डहाणू तालुक्यातील अनेक चिकू झाडांवर झाला असल्याचे दिसून आले आहे. या सफेद माशीमुळे पानाच्या पृष्ठभागावर चिकट पदार्थ टाकण्यात येत असल्याने अन्नपुरवठा शोषून घेण्यासोबत अन्न निर्मितीच्या क्रियेला खीळ बसत आहे. यंदा मुसळधार पावसामुळे या माशीवर काही प्रमाणात नियंत्रण आले असले तरी आगामी काळासाठी बागायतदारांसमोरील चिंता कायम आहे.

चिकू फळपिकाचे उत्पादन गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने कमी झाले आहे. त्या मागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. शेतकरी बागायतदार एकत्रित येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब करण्याच्या प्रयत्नात आहेत. डहाणू तालुक्यातील बागायतदार पुन्हा एकदा नव्याने संघटित होऊन या पिकाला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

— मिलिंद बाफना, चिटणीस, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ