27 September 2020

News Flash

चिकू उत्पादनात प्रचंड घट

बागायतदारांना चिंता; अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार

प्रदूषण, रोगाचा प्रादुर्भाव आदींमुळे चिकू फळाची झालेली अवस्था.

बागायतदारांना चिंता; अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणार

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : वर्षांला किमान अडीचशे—तीनशे कोटींहून अधिक उलाढाल असलेल्या चिकू फळाचे उत्पादन गेल्या तीन-चार वर्षांत निम्म्यापेक्षा कमीवर येऊन ठेपले आहे. यामागची कारणे शोधण्याचा शासन, प्रशासन स्तरावर प्रयत्न होत नसल्याने त्यासाठी बागायतदार एकत्रित येऊन त्यावर उपाय शोधण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी ते संघटित झाले असून तज्ज्ञांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पालघर जिल्ह्यात सुमारे दहा हजार हेक्टर क्षेत्रफळावर चिकूची लागवड असून हेक्टरी १००  झाडांची किमान लागवड आहे.  वर्षांला   हेक्टरी २५ टन चिकू फळाचे उत्पादन होते. मात्र,   गेल्या काही वर्षांपासून उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट झाली आहे. यामागे वातावरणातील बदल, हवेत असलेले तरंगणारे कण (पार्टिक्युलेट मॅटर) चिकूच्या पानांवर बसत असल्याने तसेच आम्लयुक्त पदार्थामुळे जमिनीवर होणारा परिणाम, प्रदूषण, बुरशीजन्य व अन्य रोग आदी कारणांमुळे उत्पादन कमी  होत आहे,  असे बागायतदारांकडून सांगितले जाते.

चिकू पिकाप्रमाणे याच परिसरात उगविणारा लिम्बडा, उंबर तसेच रानमेवा देणाऱ्या झाडांवर देखील अशाच प्रकारचा परिणाम झाला असल्याचे दिसून येत आहे. यामागची कारणे शोधण्यासाठी त्यावर संशोधन करणे व समस्यांवर उपाय काढण्यास शासन तसेच कृषी विद्यपीठ यांची मर्यादित भूमिका राहिली आहे. या सर्व बाबींचा अभ्यास करणे गरजेचे झाले असल्याचे शेतकऱ्यांना वाटू लागले आहे.  बागायतदारांचे अर्थकारण डबघाईला आले आहे. त्यामुळे कामगारांना रोजंदारी देणे बागायतदारांना कठीण होत आहे. त्यामुळे अनेक कामगार गुजरात राज्यात उद्योगांमध्ये रोजंदारीवर कामाला जाऊ  लागले आहेत.

चिकू उत्पादकांनी  वेगवेगळ्या रोगांविषयी अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ व खाजगी प्रयोगशाळेची मदत घेण्यासाठी एकत्रित येऊन विचार सुरू झाले आहेत.

हेक्टरी पाचशे रुपये इतका निधी प्रथम संकलित करून या फळपिकाला वाचवण्यासाठी पहिली बैठक १४ सप्टेंबर रोजी डहाणू येथे घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ किंवा अन्य एखाद्या संस्थेच्या छत्रछायेखाली एकत्र येऊन या फळ पिकासाठी शासकीय पातळीवर तसेच समांतर पद्धतीने खाजगी शास्त्रज्ञांची मदत घेण्याच्या येथील शेतकरी विचाराधीन आहेत. सीड बोअरर व बड बोअरर अशा अळीचा प्रादुर्भाव कमी झाला असताना फाइटोप्थोरा या बुरशीजन्य रोगाने येथील पिकाला गेल्या काही वर्षांपासून ग्रासले असल्याने चिकूचे उत्पादन झपाटय़ाने घटत असल्याचे येथील बागायतदारांचे म्हणणे आहे. जिल्ह्यात चिकूच्या माध्यमातून दहा हजार हेक्टर लागवड होत असताना त्याची कार्बन क्रे डिट घेण्यासाठी देखील प्रयत्न  करण्याचे उद्दिष्ट नव्याने संघटित होऊ पाहणाऱ्या चिकू बागायतदारांचे प्रयो सुरू झाले आहेत.

पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव

गेल्या वर्षी नारळावर आलेल्या स्पायरल वाईट फ्लाय या सफेद माशीचा प्रादुर्भाव डहाणू तालुक्यातील अनेक चिकू झाडांवर झाला असल्याचे दिसून आले आहे. या सफेद माशीमुळे पानाच्या पृष्ठभागावर चिकट पदार्थ टाकण्यात येत असल्याने अन्नपुरवठा शोषून घेण्यासोबत अन्न निर्मितीच्या क्रियेला खीळ बसत आहे. यंदा मुसळधार पावसामुळे या माशीवर काही प्रमाणात नियंत्रण आले असले तरी आगामी काळासाठी बागायतदारांसमोरील चिंता कायम आहे.

चिकू फळपिकाचे उत्पादन गेल्या काही वर्षांपासून झपाटय़ाने कमी झाले आहे. त्या मागील कारणांचा शोध घेणे आवश्यक आहे. शेतकरी बागायतदार एकत्रित येऊन वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजनांचा अवलंब करण्याच्या प्रयत्नात आहेत. डहाणू तालुक्यातील बागायतदार पुन्हा एकदा नव्याने संघटित होऊन या पिकाला आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

— मिलिंद बाफना, चिटणीस, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादक संघ

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 1:16 am

Web Title: huge decline in chiku production zws 70
Next Stories
1 करोनाकाळात पर्यटनबंदी धाब्यावर
2 घरबसल्या पैसे कमविण्याचे नवे मार्ग
3 रायगड जिल्ह्य़ात वीज रोधक यंत्रणा उभारणार
Just Now!
X