गेल्या मंगळवारप्रमाणेच आजही वळवाच्या पावसाने थैमान घालून कराड परिसरासह तालुक्याला जोरदार तडाखा देताना, कोटय़ावधी रुपयांची हानी केली आहे. कमालीच्या उष्म्याने अंगाची लाहीलाही होताना, ढग दाटून येऊन दुपारी २ वाजल्यानंतर तुफान वा-यासह विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या धुवाधार अवकाळी पावसाने शहर परिसरासह एकूणच तालुक्याची पुरती दैना उडवून दिली. त्यात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. जोरदार वादळी पावसामुळे नेहमीप्रमाणे विजेचा खेळखंडोबा झाला. तर, घरावरील पत्रे उडून जाणे, लग्नाचे मंडप, पालाच्या झोपडय़ा जागीच झोपणे, कच्च्या भिंतींच्या घरांचीही पडझड झाल्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणात घडले आहेत. दरम्यान, या वादळात करडजवळील नांदलापूर येथे घराचा पत्रा उडून पडल्याने झालेल्या अपघातात एक मुलगी जखमी झाली आहे.
या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी होताना, सखल भागात व बेसमेंटमधील दुकान गाळय़ात पाणी साचून मोठे नुकसान झाले. दरम्यान, झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली. तर, जोरदार पावसाने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने राहिली होती. गेल्या मंगळवारीही कराड, पाटण तालुक्यात जोरदार वा-यासह धुवाधार पाऊस झाला होता. त्यात कराड तालुक्यात ५४ घर मिळकतीसह आंबा, केळी व ऊस पिकांचे मिळून सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाले होते. या पेक्षाही मोठे नुकसान आजच्या पावसाने झाले असून, ते कोटींच्या घरात असण्याची शक्यता आहे.
आज कोयना धरणक्षेत्रातही ढग दाटून येताना, जोरदार पावसाचे वातावरण राहिले. मात्र, सायंकाळपर्यंत मोठय़ा प्रमाणात ढग दाटले असतानाही पाऊस कोसळला नव्हता. तर, पावसाचे वातावरण पाहता सायंकाळी उशिरा जोरदार पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत.
सध्या कोयना शिवसागरातील अल्प पाणीसाठय़ामध्ये वीजनिर्मितीमधील सातत्य राखत पूर्वेकडील गावांना गरजेनुसार पाणी पुरवले जात असल्याने धरणाचा चिंताजनक पाणीसाठा प्रत्येक दिवसाला घटतोच आहे. सायंकाळी ५ वाजता धरणाची पाणीपातळी २,०४८ फूट ११ इंच असून, पाणीसाठा १७.३४ टीएमीसी (१६.४७ टक्के) राहिला आहे. गेल्या ८ दिवसांत धरणाची पाणीपातळी प्रत्येक दिवसाला एक फूट याप्रमाणे ८ फूट कमी झाली असून, पाणीसाठा ५ टीएमसीने घटला आहे. गतवर्षी आजमितीला पाणीपातळी २,०८५ फूट ९ इंच राहताना पाणीसाठा ३५.१३ टीएमसी (३३.३७ टक्के ) राहिला होता. दरम्यान, या वादळात कराडजवळील नांदलापूर येथे घराचा पत्रा उडून पडल्याने झालेल्या अपघातात एक मुलगी जखमी झाली आहे. प्रीती विलास पवार (वय १४) असे या मुलीचे नाव आहे.