यंदाच्या उन्हाळय़ातील सर्वाधिक उष्म्याचा तडाखा बसताना, दुपारनंतर ढग दाटून आले आणि सायंकाळी चारनंतर वादळी वा-यासह विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या धुवाधार पावसाने कराड शहर परिसराची पुरती दैना उडवून दिली. आजचा हा पाऊस कराड व पाटण तालुक्यात ठिकठिकाणी कोसळल्याचे वृत्त आहे. उंब्रज ते चाफळ या पट्टय़ात पावसाने अक्षरश: थमान घातले.
वादळी पावसाने नेहमीप्रमाणे विजेचा खेळखंडोबा झाला, तर घरावरील पत्रे उडून जाणे, पालाच्या झोपडय़ा जागीच झोपणे असे प्रकार घडले. कच्च्या भिंतींच्या घरांचीही पडझड झाली. सर्वत्र पाणीच पाणी होताना, सखल भागात व बेसमेंटमधील दुकान गाळय़ात पाणी साचून मोठे नुकसान झाल्याचे चित्र होते. दरम्यान, झाडे उन्मळून पडल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती, तर जोरदार पावसाने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने राहिली होती.
कोयना धरणक्षेत्रात सायंकाळी ढग दाटून येताना जोरदार पावसाचे वातावरण होते. सध्या कोयना शिवसागरातील अल्प पाणीसाठय़ामध्ये वीजनिर्मितीमधील सातत्य राखत पूर्वेकडील गावांना गरजेनुसार पुरवले जात असल्याने गेल्या २४ तासांत धरणाची पाणीपातळी दीड फुटाने तर पाणीसाठा पाऊण टीएमसीने कमी झाला आहे. धरणाची पाणीपातळी २,०५६ फूट ५ इंच असून, पाणीसाठा २०.४७ टीएमीसी (१९.४४ टक्के) राहिला आहे. गतवर्षी आजमितीला २,०९० फूट राहताना पाणीसाठा ३७.५६ टीएमसी (३५.६८ टक्के) होता.