कमालीच्या उष्म्याने जनजीवन हैराण असताना काल बुधवारी कराड व पाटण तालुक्यातील ठिकठिकाणी वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यात गोसावीवाडी (ता. कराड) येथील गणपत खाशाबा जाधव हे जखमी झाले. तर, कवठे व उंब्रज महसूल मंडलात ९७ घरांचे पत्रे उडून जाणे, भ्िंाती कोसळणे, कच्च्या भिंतींची घरे जमीनदोस्त होणे असे प्रकार घडून सुमारे ३० लाख रूपयांचे नुकसान झाल्याची माहिती कराडचे प्रभारी तहसीलदार बी.एम. गायकवाड यांनी दिली.  
वादळी पावसात दोन हेक्टर ३० आर क्षेत्रातील आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र,उसाचे पीक असल्याने शेतीचे नुकसान झाले नसल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागात मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले असून, एकंदर नुकसानीचा आकडा कोटीच्या घरात असल्याचे चित्र आहे. या पावसात ६ जण जखमी झाले असून, झाडे, विजेचे खांब उन्मळून पडल्याने कराड -चिपळूण मार्ग काहीकाळ बंद राहिला. तर, कराड तालुक्यातील कोरेगावसह काही ठिकाणची वाहतूक खोळंबली होती.
दरम्यान, उष्म्याचा कहर कायम असून, आज सायंकाळीही ढग दाटून आले. मात्र, पावसाचा लवलेशही नव्हता. परिणामी, कराड व पाटण शहराला पावसाची सातत्याने हुलकावणी मिळत आहे. अशातच कोयना, धोम-बलकवडीसह सातारा जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमधील पाणीसाठा चिंताजनक आहे. छोटय़ा प्रकल्पात पाण्याचा खडखडाट असून, उन्हाची दाहकता, आणि पाणी टंचाईमुळे कोयना जलविद्युत प्रकल्पासह ठिकठिकाणच्या वीजनिर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पिण्यासाठी पाण्याची गरज ओळखून वीजनिर्मिती व शेतीच्या पाणी वापरावर र्निबध येण्याची शक्यता बळावली आहे.