महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेच्या २५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह ६९ जणांना क्लीन चीट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयालयात क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे. दरम्यान, या प्रकरणी अजित पवारांसह ६९ जणांना क्लीन चीट मिळाली आहे.

२५ हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर २०११ मध्ये रिझर्व्ह बँकेनं बर्खास्त केलेल्या संचालक मंडळात अजित पवार, हसन मुश्रीफ यांसह बड्या नेत्यांचा समावेश होता. या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह ७० जणांवर कलम ४२०, ५०६, ४०९, ४६५ आणि ४६७ अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, भाजपात असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांसह अन्य पक्षातील नेत्यांच्या नावाचा समावेश होता. महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

काय आहे प्रकरण?

आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. यामध्ये २५ हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर २००१ मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते. घोटाळ्यावेळी जे मंत्री आणि बँकेचे अधिकारी होते त्या सर्वांची नावे एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली होती. अशा एकूण ३०० च्यावर मंत्री आणि अधिकाऱ्यांची नावे यात आहेत.

कसे झाले राज्य सहकारी बँकेचं नुकसान?

>
संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केलं
>
नऊ साखर कारखान्यांना ३३१ कोटींचा कर्जपुरवठा
>
गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना ६० कोटींचे कर्ज
>
केन अ‍ॅग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं ११९ कोटींचा तोटा
>
२४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, २२५ कोटींची थकबाकी
>
२२ कारखान्यांकडील १९५ कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित
>
लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा तीन कोटींचे नुकसान
>
कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही ४७८ कोटींची थकबाकी
>
खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, ३७ कोटींचे नुकसान
>
८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६.१२ कोटींचा तोटा