ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पालगत तीन दिवसांपूर्वी वनाधिकाऱ्यांसोबत झालेला प्रकार मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे द्योतक आहे. या संघर्षांत मानवी मृत्यू ही घटना निश्चितच दु:खदायक आहे. मात्र, यात वाघाने गावात येऊन गावकऱ्यांना मारलेले नाही, तर वारंवार सांगूनही गावकऱ्यांची जंगलातील घुसखोरी न थांबल्यामुळे त्यांना मृत्यूला त्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे वनाधिकाऱ्यांसोबत झालेल्या या घटनेचे मुळीच समर्थन करता येण्यासारखे नाही.
मानव-वन्यजीव संघर्षांचा आलेख गेल्या काही वर्षांत चढता राहिलेला आहे. या संघर्षांत मानवी बळींची संख्या अधिक आहे. मात्र, यातील ९५ टक्के घटनांमध्ये झालेले मृत्यू हे घनदाट जंगलात गावकऱ्यांच्या घुसखोरीमुळे, केवळ ५ टक्के घटनांमध्ये वाघाने गावात शिरकाव करून गावकऱ्यांना मारलेले आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनअंतर्गत येणाऱ्या मूल तालुक्यातील निंबाळा गावातील महिलेचा मृत्यू या ९५ टक्क्यांमध्ये मोडणारा आहे. वनखात्याकडून जंगलालगतच्या गावकऱ्यांसाठी कित्येक योजना अलिकडे सुरू झाल्या आहेत, तरीही वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आदेशाला डावलून ते जंगलात जातात. निंबाळा गावातील ही महिलाही तिच्या सहकाऱ्यांसह अगदी पहाटे सरपणासाठी गेली आणि वाघाचा बळी ठरली. यात वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चूक किती, असा प्रश्न विचारला तर नाही, असेच उत्तर मिळेल. वाघाचा धोका ओळखूनच गावकऱ्यांनी जंगलात खूप आत जाऊ नये म्हणून या ठिकाणी सोलर फेन्सिंग लावण्यात आले. मात्र, ते गावकऱ्यांनी कधीचेच तोडून जंगलातील नित्यनेमाने त्यांची कामे सुरू केली.
निंबाळाच्या घटनेत सहाय्यक वनसंरक्षकांपासून तर सर्वच कर्मचारी घटनास्थळी गेले. त्यांनी पंचनामाही केला आणि त्यानंतर गावकऱ्यांनीच बैलबंडीवरून मृतदेह जंगलातून गावाच्या वेशीपर्यंत आणला. सारे काही शांतपणे पार पडत असतानाच काही अतिउत्साही गावकऱ्यांनी वनाधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी सुरू केली. गावाच्या वेशीपासून तर गावाच्या आत अर्धा किलोमीटपर्यंत बैलबंडीवरुन तो मृतदेह वनाधिकाऱ्यांना आणण्यास भाग पाडले. ही घटना वनाधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करणारी आहे. वाघाच्या हल्ल्यातील त्या महिलेचा मृत्यू समर्थनीय नाही, पण त्याच वेळी वनाधिकाऱ्यांसोबत घडलेला प्रकारही समर्थनीय नाही. लोकप्रतिनिधींचे पाठबळ गावकऱ्यांना असल्यामुळेच गावकऱ्यांची हिंमत वाढत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. वाघाने माणसाचा बळी घेतला की, त्याचे राजकारण करायचे. वाघाला नरभक्षक ठरवून वनाधिकाऱ्यांना त्या वाघाला गोळी घालून ठार मारण्यास भाग पाडायचे आणि गावकऱ्यांकडून मतांचा जोगवा मिळवायचा. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षेत्रातच हे प्रकार घडले आहेत. मात्र, आता वनमंत्री म्हणून त्यांना त्यांच्याच कार्यक्षेत्रातील त्यांच्या खात्याची प्रतिमा अशी मलीन झालेली चालणार आहे का, हा प्रश्नच आहे. गावकऱ्यांच्या दु:खात सहभागी होतानाच त्यांच्या निदर्शनास त्यांच्या चुका आणून देणेही तेवढेच गरजेचे आहे. लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या प्रकाराबद्दल वाच्यता केली होती. त्यामुळे दोन्ही आघाडय़ांवर ही जबाबदारी पेलण्यात ते यशस्वी ठरतात का, हे येत्या काही दिवसातच कळेल.