03 March 2021

News Flash

डहाणूच्या संरक्षित वनक्षेत्रात मानवी हस्तक्षेप

डहाणूचे वनक्षेत्र सध्या संवेदनशीन बनले आहे. या क्षेत्रात बिबटय़ांचा वावर आहे

(संग्रहित छायाचित्र)

नितीन बोंबाडे

जंगलक्षेत्र कमी झाल्याने मानवी वस्तीत बिबटय़ांचा वावर

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणूजवळ धानिवरी येथे गेल्याच आठवडय़ात कारच्या धडकेत एक बिबटय़ा ठार झाला. वर्षभरात मानवी वस्तीत शिरकाव केलेल्या चार बिबटय़ांना जेरबंद करण्यात आले.. डहाणूजवळील मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढू लागला आहे. याचे कारण आहे, संरक्षित वनक्षेत्रात सुरू असलेला मानवी हस्तक्षेप. जमीन मिळवण्यासाठी जंगल नष्ट केले जात असून बिबटय़ाचे आश्रयस्थान कमी होऊ लागले आहे.

डहाणूचे वनक्षेत्र सध्या संवेदनशीन बनले आहे. या क्षेत्रात बिबटय़ांचा वावर आहे. वनमित्रांच्या माहितीनुसार २८ ते ३० बिबटय़ांचे वास्तव्य डहाणूजवळील वनक्षेत्रात आहे. प्रत्येक बिबटय़ा दररोज पाच चौरस किमी फिरत असतो. जंगलातील सुरक्षित क्षेत्र, शिकारीचे संरक्षित क्षेत्र आणि मानवी वस्ती असे तीन भाग असतात. मानवी हस्तक्षेपामुळे जंगलातील संरक्षित क्षेत्र नष्ट होऊ लागले आहे, तर महामार्ग, प्रकल्पामुळे बिबटय़ांच्या संचार क्षेत्रात हस्तक्षेप केला आहे. बिबटय़ा हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक असूनही त्याच्या रक्षणासाठी कोणतीही उपाययोजना वन विभागाकडे नाही. नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा चार महिन्यांचा काळ बिबटय़ाचा प्रजननाचा काळ समजला जातो. मादी बिबटय़ाला प्रजननाच्या काळात खायला अधिक लागते. त्यामुळे नर बिबटय़ा संरक्षित क्षेत्रात शिकारीच्या शोधात असतात. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे संरक्षित क्षेत्र नष्ट झाल्याने बिबटय़ा मानवी वस्तीत शिरू लागले आहेत. गेल्या वर्षभरात मानवी वस्तीत शिरकाव केलेल्या चार बिबटय़ांना जेरबंद करण्यात आले, तर दोन बिबटे महामार्गावर अपघातात ठार झाले.

महामार्गामुळे जंगलपट्टय़ाचे विभाजन

एक बिबटय़ा ५ चौरस किलोमीटर परिसरात फिरत असतो. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तलासरी ते आच्छड, हळदपाडा ते आंबोली, आंबोली ते सोमटा हे बिबटय़ाचे संचार क्षेत्र आहेत. बिबटय़ाच्या संचार क्षेत्रातून महामार्ग गेल्याने त्यांच्या क्षेत्राचे विभाजन झाले आहे. त्यामध्ये फिरताना महामार्ग ओलांडताना अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये दुर्दैवाने बिबटय़ांच्या संख्येत घट होऊ  लागली आहे.

समुद्रकिनारी वावर

डहाणू खाडी, सफाळे, दांडा खाडी, सातपाटी, पाचमार्ग  या भागात बिबटय़ा आढळून आला आहे. मात्र बिबटय़ाच्या शरीरात मिठाचे प्रमाण कमी झाले की ते समुद्राच्या दिशेने जात असल्याने त्यांचा समुद्रकिनारी वावर वाढला असल्याचे प्राणीमित्रांकडून सांगण्यात आले.

बिबटय़ा हा  पर्यावरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याला वाचवणे गरजेचे आहे. माणसाने  त्यांच्या क्षेत्रात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे त्यांची मानवी वस्तीत होणारा वावर सांभाळून घेतला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीने वन विभागाच्या कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे.

– धवल कंसारा, वनसंरक्षण आणि पशुकल्याण संस्थेचे अध्यक्ष

डहाणू विभागात आढळलेल्या बिबटय़ांना उपचारांसाठी बोरिवलीतील संजय गांधी उद्यानात उपचार केले जातात.

-बी. एच. भिसे, उपवन संरक्षक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2019 2:44 am

Web Title: human intervention in dahanu protected forests
Next Stories
1 बालमृत्यू रोखण्यासाठी ‘मिशन मेळघाट’
2 पोलीस दलात मोठे फेरबदल
3 राज्यपालांच्या अभिभाषणात जुन्याच योजनांची जंत्री
Just Now!
X