सांगलीतील विश्रामबाग पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे. पोलिसांनी थर्ड डिग्री वापरल्यामुळे आरोपीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी राज्याचे महासंचालक सतीश माथूर यांना आयोगाने नोटीस बजावली आहे. चाकूचा धाक दाखवून लुटल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी अनिकेत कोथळेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना विश्रामबाग पोलीस ठाण्यात घडली होती. या प्रकरणात अनिकेत पोलीस कोठडीतून पळाल्याचा बनाव पोलिसांनी रचला. मात्र, सखोल चौकशीनंतर अनिकेतचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी अनिकेतचा मृतदेह आंबा घाटात नेऊन जाळल्याची धक्कादायक बाबही उघड झाली होती. या प्रकरणी सांगलीतील न्यायालयाने आरोपी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यांच्यासह सहाजणांना १२ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर आता राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने राज्याच्या महासंचालकांना नोटीस पाठवली आहे.