13 July 2020

News Flash

विदर्भातील मानव-वन्यप्राणी संघर्ष तीव्र

एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडलेल्या हिंस्र प्राण्यांनी २० दिवसांत ६ माणसांचे बळी घेतल्याने विदर्भातील मानव-वन्यप्राणी संघर्ष आता

| April 15, 2013 03:57 am

एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातच उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असून पाण्याच्या शोधात जंगलाबाहेर पडलेल्या हिंस्र प्राण्यांनी २० दिवसांत ६ माणसांचे बळी घेतल्याने विदर्भातील मानव-वन्यप्राणी संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये लाकूडफाटा आणि मोहफुले गोळा करण्यासाठी जाणाऱ्यांवर वाघ आणि बिबटय़ाने हल्ले केल्याने प्रचंड दहशत आहे. नरभक्षक वाघ अद्याप मोकळाच आहे, तर बिबटय़ाला जेरबंद करण्यात आले आहे.
गेल्या आठवडय़ात नीलिमा कोटरंगे, ललिता आनंदराव पेंदाम, तुकाराम धारणे आणि मालन मुनघाटे हे गावकरी हिंस्र प्राण्यांच्या तावडीत सापडले. वारंवार इशारे देऊनही वन खात्याला न जुमानता लोक बफर झोनमध्ये शिरत असून घडलेल्या घटनांसाठी वन खात्याला जबाबदार धरले जात आहे. जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांचे दैनंदिन जीवन जंगलातील स्रोतांवरच अवलंबून असून त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. लोकांनी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी जंगलात जाऊन जीव धोक्यात घालू नये, यासाठी काही गावांमध्ये आता गॅस सिलिंडरची सुविधा पुरविण्यात आहे; परंतु बहुतांश गावांतील लोकांना स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडांवरच अवलंबून राहावे लागत असल्याने जंगलात जाण्याशिवाय त्यांना पर्याय नाही.
ही परिस्थिती अशीच कायम राहिल्यास जंगल क्षेत्रातील गावांमधील मानव-वन्यप्राणी संघर्ष अधिक उग्र स्वरूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळ्यात अशा घटना वारंवार घडतात. उन्हाने मार्चअखेरीस रंग दाखविणे सुरू केले असून अद्याप दोन महिनेपर्यंत तरी जंगलात पाण्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे तहानलेले प्राणी पाण्याच्या शोधात गावांच्या पाणवठय़ापर्यंत पोहोचण्याची शक्यता वन खात्याने गृहीत धरली आहे. यासाठी गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असला तरी गावकरी याला जुमानत नसल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी गोंदिया-भंडाऱ्याच्या सीमावर्ती गावांमध्ये वाघ आणि बिबटय़ाने पाच माणसांचे बळी घेतले होते. यात लोकांनी वन खात्याच्या हद्दीत प्रवेश केल्याने त्यांच्यावर वन्यजीवांनी हल्ले केल्याची वस्तुस्थिती उघड झाली होती. यापैकी एका नरभक्षक वाघिणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आले आहे. आता ताडोबाच्या जंगल क्षेत्रातील गावांमध्ये असा संघर्ष उद्भवला असून त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी वन खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. माणसांवरील घटना पहाटेच्या आणि सकाळी ११ च्या सुमारास घडलेल्या आहेत. आगरझरीची घटना तर अत्यंत थरारक आहे. मृतदेहाचा पंचनामा सुरू असताना झाडावर दबा धरून बसलेला बिबटय़ा महिलेच्या दिशेने झेपावल्याचा दुर्मीळ प्रसंग गावकऱ्यांनी ‘याचि डोळा’ पाहिला. यापाठोपाठ घडलेल्या घटनेत मायलेकींपैकी शाळकरी विद्यार्थिनी असलेल्या मुलीचा मृत्यू झाला असून तिला वाचविण्यासाठी बिबटय़ाशी झुंज घेणारी आई मृत्यूशी झुंज देत आहे.
ताडोबा बफर झोनमधील गावांमध्ये ही स्थिती उद्भवली आहे. चोरगाव, आगरझरी, मोहुर्ली, पाथरी आणि सावली या गावांमध्ये हिंस्र प्राण्यांची प्रचंड दहशत पसरली आहे. पंधरा दिवसांत सहा लोकांचे बळी गेल्याने गावांमधील वातावरण सुतकी झाले आहे. या गावांना वन पर्यटनच्या धोरणातून अद्यापही पर्यायी उत्पन्नाचे स्रोत उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांची दैनंदिनी जंगलावरच अवलंबून आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज असल्याचे मत सातपुडा फाऊंडेशनचे किशोर रिठे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2013 3:57 am

Web Title: human wild animal acute struggle in vidharbha
टॅग Drought,Human
Next Stories
1 उत्तर महाराष्ट्रात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात
2 एसटी कामगारांना १३ टक्के वेतनवाढ असमाधानकारक – आ. जयप्रकाश छाजेड
3 जुळ्या मुलींवर नराधम पित्याचा लैंगिक अत्याचार
Just Now!
X