दिगंबर शिंदे

चांदोली अभयारण्यापासून कोसो दूर असलेल्या सांगली शहराने बिबट्याचा चौदा तासांचा थरार अनुभवला. एकीकडे कृष्णा नदीतील मगरींचे भय असताना उसाच्या फडातील रानडुकरावर गुजराण करणारे बिबटे आता भटक्या कुत्र्यांना लक्ष्य करण्यासाठी अभयारण्याबाहेर पडले आहेत. यानिमित्ताने वन विभागाच्या उणिवांची  चर्चा होण्याची गरज आहे.

मानव आणि वन्यप्राण्यांमध्ये अगोदर जगण्यासाठी सीमारेषा ठरली होती. पोट भरलेले जनावर सहजासहजी भक्ष्यावर हल्ला करीत नाही. मात्र मानवाच्या अमर्याद अपेक्षांनी वन्यप्राण्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करीत जंगले नष्ट केली. त्यांच्या जगण्याची जी साखळी आहे तीच उद््ध्वस्त करीत आणल्याने वन्यप्राणी अस्तित्वासाठी झगडत आहेत. आठ-दहा वर्षांपूर्वी चांदोली राखीव वन क्षेत्रामध्ये असलेले बिबटे, गवे आता मानवी वस्तीजवळ वास्तव्य करू लागले. वारणा, कृष्णा नदीच्या काठाला असलेले उसाचे शेकडो किलोमीटरचे वावर त्यांना लपण्यासाठी आणि खाद्यासाठी विश्वासक वाटू लागले. एकदा उसाचे कांडे लावले की, कारखान्याची तोड येईपर्यंत फडामध्ये जाण्याची गरजच भासत नाही अशी स्थिती निर्माण झाली. यातून बिबट्यांनी प्रजननासाठी उसाच्या फडातच आपले संसार थाटले आहेत हे गेल्या आठवड्यातील वाळवा तालुक्यातील सुरूल येथे आढळलेल्या तीन बिबट्यांच्या पिलांवरून स्पष्ट झाले.

उसाची तोड चालू झाल्यानंतर एका उसाच्या फडात एकाच ठिकाणी १५ दिवसांचे तीन बिबट्यांचे बछडे आढळले. वन कर्मचाऱ्यांनी  योग्य खबरदारी घेत पिलांची आईच या बछड्याचे योग्य संगोपन करू शकते याची जाणीव ठेवून मानवी हस्तक्षेप टाळत या पिलांना मादी बिबट्याची ऊब मिळवून देण्यात यश मिळवले. यावरून उसाचे वाढते क्षेत्र हेच आता बिबट्यांचे आश्रयस्थान बनले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे या वन्यप्राण्यांनी मानवासोबतचे सहजीवन मान्य केले आहे. यामुळे मानवालाही वन्यप्राण्यांचे सहअस्तित्व मान्य करण्यावाचून पर्याय नाही.

जिल्ह््यात चांदोली परिसरानजीक असलेली शिराळा तालुक्यातील मणदूर, मिसखेलवाडी, सोनवडे, अंबाईवाडी, खुंदलापूर या परिसरांत एखादा दिवस वगळता नित्य घडणारे बिबट्याचे दर्शन आणि वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी, तुजारपूर, इटकरे, नेर्ले, केदारवाडी, सुरूल परिसरांतील ऊस शेतीमध्ये आठ-पंधरा दिवसांनी आढळणारे बिबटे हे त्यांनी जगण्याची पद्धती बदलल्याची चिन्हे आहेत. पाच-सात वर्षांपूर्वी उसाच्या फडात असलेली रानडुकरे शिकारीला बळी पडल्याने या वन्यप्राण्यांचे खाद्य कमी झाले. अन्नाच्या शोधात असलेल्या बिबट्यांनी मग मानवी वस्तीजवळ सहज उपलब्ध असलेली शेळी, भटके श्वान, रेडके ही लहान जनावरे बिबट्याचे खाद्य ठरत आहेत. यामुळे बिबट्यांनी विनासायास मिळणाऱ्या भक्ष्यावर गुजराण करण्याची मानसिकता तयार केली आहे.

याचबरोबर गवेही अभयारण्यातील गवताळ प्रदेश कमी झाल्याने ऊस शेती त्यांच्या जगण्याला आश्वासक बनवत आहेत. मानवनिर्मित सागरेश्वर अभयारण्यातील हरणेही खाद्याच्या शोधात आजूबाजूच्या शेतीत येत आहेत. ताकारी, टेंभू योजनेच्या शाश्वत पाण्यामुळे आठ-दहा वर्षांपूर्वी केवळ ज्वारी, बाजरीची शिवार आज ऊस शेतीने सदाहरित झाली आहेत. यामुळे हे प्राणीही जगण्यासाठी मानवी वस्तीकडे आकृष्ट होत आहेत. याउलट जागा मिळेल तिथे घरे करून मानवी वस्ती विस्तारत आहे. यातून वन्यप्राण्यांचा वावर मानवी वस्तीशेजारी अधिक प्रमाणात दिसत आहे.

सांगली शहरामध्ये बुधवारी बिबट्याचे पहिल्यांदाच आगमन झाले, तेही मध्यवस्तीमध्ये. तो कोठून आला याचा मागमूस लागलेला नसला तरी वाळवा परिसरातीलच तो असण्याची दाट शक्यता आहे. याच दरम्यान, याच वेळी तासगावमध्येही खाडेवाडी या विस्तारित भागात गव्याची जोडी बुधवारीच निदर्शनास आली. यापूर्वी सांगलीच्या गव्हर्मेंट कॉलनीमध्ये फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये गव्याचे दर्शन झाले होते, तर महाकाय मगरींचे अस्तित्व सांगलीच्या नजीक असलेल्या कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या वन्यप्राण्यांचे अस्तित्व मान्य करूनच आता मानवाला आपले व्यवहार सांभाळावे लागणार आहेत. तटकरे येथील लहान मुलांवर केलेला हा हल्ला वगळता अद्याप मानवावर बिबट्याने हल्ला केल्याचे उदाहरण नसले तरी मगरीच्या हल्ल्यात गेल्या सात वर्षांमध्ये १३ जणांचा बळी गेला आहे.

वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाने काही ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. सागरेश्वर अभयारण्य बंदिस्त करण्याबरोबरच प्राण्यांना त्यांचे भक्ष्य राखीव जागेतच उपलब्ध होईल याची व्यवस्था करण्याची गरज आहे. चांदोली अभयारण्यात वन्यप्राण्यांची अन्नसाखळी मजबूत करण्यासाठी हरणांची पैदास कशी वाढवली पाहिजे यासाठी सागरेश्वर अभयारण्याचा प्रदेश उपयुक्त ठरू शकतो. याचबरोबर आपत्कालीन स्थितीमध्ये बचावकार्य करण्यासाठी जाळी, लोखंडी पिंजरे, बिबट्यांना बेशुद्ध करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी यांची गरज बिबट्याने समोर आणली आहे.

जिल्ह््यातील एका पाहणीनुसार ५७ बिबट्यांचे अस्तित्व असल्याचे आढळून आले असून यापैकी २७ नर आणि २६ मादी आहेत, तर चांदोली अभयारण्याचा परिसर वगळून सात गवे सागरेश्वर, पलूस परिसरात असल्याचे दिसून आले आहे. यांना जगण्याची शाश्वती मिळाल्याने नजीकच्या काळात त्यांची संख्या वाढणार आहे. निसर्गसाखळी अबाधित राहण्यासाठी त्यांनाही जगण्याचा अधिकार देणे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे.

बिबट्यांचे नवे आश्रयस्थान

उसाची तोड चालू झाल्यानंतर उसाच्या फडात एकाच ठिकाणी १५ दिवसांचे तीन बिबट्यांचे बछडे आढळले. वन कर्मचाऱ्यांनी  योग्य खबरदारी घेत त्यांची  आईच या बछड्याचे योग्य संगोपन करू शकते याची जाणीव ठेवून मानवी हस्तक्षेप टाळत या पिलांना मादी बिबट्याची ऊब मिळवून देण्यात यश मिळवले. यावरून उसाचे वाढते क्षेत्र हेच आता बिबट्यांचे आश्रयस्थान बनले असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

वन्यप्राण्यांचे अस्तित्व मान्य करून सहजीवन जगण्याची सवय मानवाला परंपरेने सांगितली आहे. मात्र आधुनिकीकरणात हे सहअस्तित्वच आपण गमावण्याची चूक केली. यापुढील काळात आपणाला वन्यप्राण्यांचे सहजीवन मान्य करीत असताना काही खबरदारी घेतली तर काहीही धोका मानवी अस्तित्वाला या वन्यप्राण्यापासून नाही हे लक्षात घेऊन जगावे लागणार आहे.  – प्रमोद धानके, जिल्हा वनाधिकारी, सांगली.