विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीच्या वाटेवर असलेल्या भक्तिचैतन्याच्या सोहळा ‘भेदभाव असे अमंगळ’ या प्रमाणे कोणत्याही जाती-धर्माचा नाही. लेकुरवाळ्या विठ्ठलाची भक्ती करीत विविध जाती-धर्मातील मंडळी संतपदी पोहोचली. निखळ भक्तीचा भागवत धर्म व माणुसकी ही एकच जात संतांनी सांगितली. त्यातून विविध जाती-धर्माची मंडळी पंढरीच्या वाटेवर चालत असतात. जाती-धर्माबरोबर या सोहळ्याने राज्यांच्या सीमाही ओलांडल्या आहेत. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटकमधील हजारो भक्तांना या सावळ्या विठ्ठलाचा लळा लागलेला आहे. भक्ती करताना त्यांना भाषेची अडचण येत नाही व त्यात सीमावादही अडसर ठरत नाही. नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका थेट पंजाबपर्यंत नेली होती. भक्तिपंथाच्या त्याच सेतूवरून पंजाबातील भक्तही या सोहळ्याला जोडला गेला आहे.
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु।
येणे मज लावियेला वेधु।।
संत ज्ञानेश्वर माउलींनी अशा प्रकारे विठ्ठलाची ओळख सांगितली आहे. त्यामुळे हा विठ्ठल कर्नाटकीचा आहे, असेही काही जण म्हणतात. कारण काहीही असले, तरी कर्नाटकातील भाविकही विठ्ठलाच्या भक्तीचा भुकेला आहे. पंढरपूर हे श्रेत्र महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांच्या सीमेजवळ आहे. सीमेजवळच्या बेळगाव, धारवाड, हुबळी, विजापूर, गुलबर्गा आदी भागातून मोठय़ा प्रमाणावर भाविक या पायी वारीमध्ये कित्येक वर्षांपासून सहभागी होत आहेत. अनेकांच्या घरामध्ये वारीची ही परंपराच निर्माण झाली आहे. ‘कर्नाटक दिंडी’ या नावाने ही वारकरी मंडळी ओळखली जातात. वारी व पालखी सोहळ्यातील सर्व प्रकारच्या परंपरा ही मंडळी अत्यंत चोखपणे पाळतात. वारीच्या वाटेवर चालणाऱ्या वेगवेगळ्या दिंडय़ांमध्ये त्यांचा सहभाग आहे.
कर्नाटकातील वारकऱ्यांच्या मुखातून मराठी अभंग ऐकायला मिळतो तेव्हा अनेक जण चकित होतात. मराठी बोलता व वाचताही येत नसताना ही मंडळी इतक्या स्पष्ट उच्चारात मराठी अभंग म्हणतात तरी कसे, हा प्रश्न पडतो. वारीच्या वाटेवरील अनेक मराठी अभंग या मंडळींनी कानडी लिपीमध्ये लिहून घेतले आहेत. इंग्रजी लिपीचा वापर करून मोबाइलवर आपण ज्याप्रमाणे मराठी एसएमएस टाईप करतो. अगदी तशाच प्रकारे कानडीमध्ये या मंडळींनी अनेक अभंग लिहिले आहेत. अनेक वर्षे हे अभंग गात असल्याने आता त्यांचे पाठांतरही झाले आहे. अनेक अभंगांचा अर्थ त्यांना माहीत नसला, तरी त्यात असलेला भक्तीचा भाव मात्र त्यांना चांगला समजतो. त्यामुळे या अभंगाची गोडी त्यांना लागली आहे.
कर्नाटकातील वारकऱ्यांबरोबच महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या गुजरात, मध्य प्रदेशबरोबरच आंध्र प्रदेशातूनही विविध दिंडय़ा वारीच्या वाटेवर सहभागी होतात. ज्ञानोबा-तुकाराम हा वारीच्या वाटेवरील मंत्र त्यांना माहीत आहे. त्यामुळे या भक्तीसाठी त्यांनाही भाषेची अडचण येत नाही. कोकण किंवा मुंबईतून काही कोळी बांधवांच्या दिंडय़ावारीत येतात. त्याबरोबरीने गोवा राज्यातूनही कोळी बांधव मोठय़ा प्रमाणावर वारीच्या वाटेवरील भक्तीत सहभागी असल्याचे दिसून येते.
मासे पकडणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय व भोजनातील मुख्य घटकही मासे हाच असतो. पण, वारी सुरू झाल्यानंतर थेट गुरुपौर्णिमेपर्यंत त्याला हातही लावला जात नाही. भक्तीच्या या वीस दिवसांच्या सोहळ्यातून काहींचे परिवर्तनही झाले आहे. गोवा भागातून वारीत येणाऱ्या अनेक कोळी बांधव चक्क माळकरीही झाले आहेत. त्यामुळेच हा केवळ भक्तीचाच सोहळा राहत नाही, तर जीवनातील परिवर्तनाचाही मार्ग बनतो!