17 December 2017

News Flash

सांगली बाल सुधारगृहाने जागवली माणुसकी

सांगलीचा अनाथ आश्रम. ७ वर्षांची कोवळी पोर. कालपर्यंत तिच्या दिलाची धडकन आज थांबते की

दिगंबर शिंदे, सांगली | Updated: May 19, 2015 4:00 AM

सांगलीचा अनाथ आश्रम. ७ वर्षांची कोवळी पोर. कालपर्यंत तिच्या दिलाची धडकन आज थांबते की उद्या याची चिंता सांगलीच्या बाल सुधारगृहाला लागलेली, पण.. प्रशासनातील माणुसकी पाणावली अन् आज ही चिमुकली मनमोकळा श्वास घेण्यास सज्ज झाली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड आणि बालसुधारगृहाच्या पथकाने प्रयत्न करीत एका अनाथ मुलीच्या दिलाची धकधक सुरू ठेवण्यात यश मिळविले. मुंबईच्या सुराणा इस्पितळात तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. अन् सांगलीच्या बाल सुधारगृहातील साऱ्यांचेच डोळे पाणावले.
बुधगाव येथील जान्हवी प्रमोद माळी ही ७ वर्षांची मुलगी. आई-बापानी ऑगस्ट २०१४ मध्ये अजाण जान्हवीला शेजारी राहणाऱ्या  श्रीमती रेखा बसरावत यांच्या हवाली केले आणि सांगलीला जाऊन येतो असे सांगत कायमचाच पोबारा केला. आज ना उद्या तिचे मायबाप येतील असे समजून सहा महिने शेजारणीने वाट पाहिली. पोटच्या पोरीसारखा सांभाळ केला, पण किती दिवस करणार? न्यायालयाच्या आदेशानुसार छोटय़ा जान्हवीला बाल सुधारगृहाच्या ताब्यात दिले.
तथापि, एवढय़ावरच तिचे दुर्भाग्य संपले नाही. नियमित तपासणीत या चिमुकलीला हृदयरोगाचा गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. तिच्यावर तातडीची शस्त्रक्रिया करणे आवश्यक ठरले. मात्र या वैद्यकीय खर्चाचे काय, असा प्रश्न बाल स्वास्थ्य आरोग्य अभियानाचे डॉ. प्रमोद चौधरी, सहायक संदीप मनोळी व वैद्यकीय अधिकारी श्रीमती सारिका चौधरी यांना पडला.
जिल्हाधिकारी गायकवाड यांच्या आढावा बैठकीत ही बाब नजरेसमोर येताच तातडीने हालचाली झाल्या. मायबापाविना पोरक्या ठरलेल्या जान्हवीच्या ह्रदयाची धडकन सुरू ठेवण्यासाठी मग मुंबईच्या सिध्दीविनायक ट्रस्ट व एकम फौंडेशनने प्रत्येकी २५ हजार रुपये आणि अन्य सामाजिक संस्थांनी २५ हजार असे ७५ हजार रुपये जमले. ३ ते साडेतीन लाखाचा वैद्यकीय उपचाराचा खर्च रुग्णालयाने सव्वा लाखापर्यंत कमी केला. तिच्यावर यशस्वी शत्रक्रिया करण्यात आली असून जान्हवी आज रुग्णालयात भावी आयुष्याची स्वप्ने पाहण्यात दंग आहे.

First Published on May 19, 2015 4:00 am

Web Title: humanity saw in sangali reformatory home