दारिद्रय़रेषेखालील गटासाठी मोफत, तर इतर लोकांसाठी माफक शुल्क आकारून आयोजित केल्या जाणाऱ्या मोतिबिंदू शस्त्रक्रियांच्या माध्यमातून तब्बल १०० गावे मोतिबिंदूमुक्त करण्याचा ध्यास उदगीरच्या उदयगिरी लायन्स नेत्रालयाने घेतला आहे. गेल्या ९ वर्षांत अशा ८४ हजार शस्त्रक्रिया करण्यात आल्या. साडेसात लाख रुग्णांची तपासणी करून १ हजार ४७० शिबिरे घेण्यात आली. अशा प्रकारे मोठय़ा संख्येने गावे मोतिबिंदूमुक्त करण्याचे महाराष्ट्रातील हे आगळे उदाहरण ठरले आहे.
शासकीय दवाखान्यातही मोतििबदू शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. मात्र, दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांवरच ही शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णाला शोधून त्याला रुग्णालयात आणून शस्त्रक्रिया करण्याची यंत्रणा सरकारकडे नाही. मात्र, समाजाची ही गरज लक्षात घेऊन उदयगिरी लायन्स नेत्रालयाने काम सुरू केले. रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. रामप्रसाद लखोटिया यांच्या दूरदृष्टीतून  अनेक उपक्रम राबवले जात आहेत.
परभणी, नांदेड, िहगोली, तसेच कर्नाटकात बिदर जिल्हय़ाच्या भालकी, औराद बाऱ्हाळी भागातील रुग्ण मोठय़ा प्रमाणावर या शस्त्रक्रियेसाठी येतात. डोळ्यांच्या नियमित तपासणीसाठी नांदेडच्या कंधार तालुक्यातील पेठवडज, परभणीच्या ताडकळस, सोनपेठ व गंगाखेड या ४ ठिकाणी रुग्णालयाच्या वतीने व्हिजन सेंटर कार्यरत आहेत. या ठिकाणी केवळ १० रुपयांत रुग्णांचे डोळे तपासले जातात. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे, अशा रुग्णांना उदगीर येथे रुग्णालयाच्या खर्चाने आणले जाते. मोफत शस्त्रक्रिया करून चष्मा, जेवण, निवास व्यवस्था केली जाते व पुन्हा रुग्णाला त्याच्या गावापर्यंत सोडले जाते.
रुग्णालय परिसरातील सुमारे १०० गावे मोतििबदूमुक्त करण्याचा संकल्प रुग्णालयाने सोडला आहे. त्यासाठी १० गावांचे एक केंद्र अशा पद्धतीने १० केंद्रे तयार केली आहेत. लातूर जिल्ह्य़ातील अंधोरी (तालुका अहमदपूर), औराद (निलंगा), लाळी (जळकोट) व शिरूर अनंतपाळ, नांदेड जिल्हय़ातील पेठवडज (कंधार), हाणेगाव (देगलूर) व मुखरामाबाद, तसेच बीदर जिल्हय़ातील मेहकर (भालकी) या गावांना केंद्रिबदू मानून १० गावांतील सुमारे २० हजार अशा १ लाख लोकांचे या दृष्टीने सर्वेक्षण केले. दर आठवडय़ाला मोतििबदू शिबिर घेण्यात येते. आतापर्यंत या भागातील १ हजार ८०० रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. येत्या वर्षभरात ही गावे मोतििबदूमुक्त होतील. नव्याने निर्माण होणारे मोतीिबदू यात गृहीत धरले नाहीत. मात्र, गावातील जुना मोतििबदू असलेला रुग्ण आढळणार नाही.
ऑपरेशन आय साईट या स्वयंसेवी संस्थेने या योजनेसाठी मार्गदर्शन केले. प्रशिक्षण देण्यासाठी या संस्थेने पुढाकार घेतला. लायन्स रुग्णालयात ६ पूर्ण वेळ डॉक्टर व दोन अर्ध वेळ डॉक्टर आहेत. ६० खाटांच्या रुग्णालयात १२० कर्मचारी आहेत. आंध्र, कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेवर उभारलेल्या या रुग्णालयामुळे परिसरातील रुग्णांना चांगली संधी उपलब्ध झाली आहे. दर महिन्याला सुमारे २५ ते ३० नेत्रतपासणी शिबिरे घेतली जातात व बाराशे ते पंधराशे रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांपकी ७० टक्के रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया केली जाते, तर ३० टक्के रुग्णांकडून शुल्क घेतले जाते.
मोफत शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांसाठी राज्य सरकारकडून १ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र, त्यावर रुग्णालयाचा सुमारे २ हजार २०० ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत खर्च होतो. हा खर्च भागवण्यास ज्या ३० टक्के लोकांकडून शस्त्रक्रियेसाठी पसे घेतले जातात, त्यातून व देणगीरूपातून आíथक साह्य़ उपलब्ध केले जाते.