जिल्हयात करोना बळीच्या संख्येने शनिवारी शंभरी पार केली. आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्हयात १०१ रुग्ण दगावले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानुसार आठ नवे रुग्ण शनिवारी आढळले. रॅपिड टेस्टमध्ये सकारात्मक आलेल्या रुग्णांचाही समावेश करण्यात आल्याने एकूण रुग्ण संख्या २०६५ वर पोहोचली आहे. जिल्हय़ातील वाढती रुग्ण संख्या व मृत्यूदर चिंताजनक ठरत आहे.

जिल्हय़ात ग्रामीण भागात करोनाचा वेगाने प्रसार होत आहे.  दरम्यान, जिल्’ातील २२१ अहवाल नकारात्मक, तर आठ अहवाल सकारात्मक आले आहेत. शनिवारी रात्री रॅपिड टेस्टमध्ये नऊ  जणांचे अहवाल सकारात्मक आले. रॅपिड टेस्टच्या माध्यमातून आतापर्यंत ९८ रुग्ण आढळले. सध्या २८२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली. दोन्ही पुरुष रुग्ण असून त्यातील एक ७६ वर्षीय तर अन्य ५४ वर्षीय आहे. अकोट येथील ते रहिवासी होते. त्यांना १० जुलै रोजी दाखल करण्यात आले होते.  सकाळी प्राप्त अहवालात चार रुग्ण आढळले. ते चारही पुरुष आहेत. त्यातील तीन जण बोरगाव मंजू येथील तर अन्य एक जण अकोली जहागिर ता.अकोट येथील रहिवासी आहेत. सायंकाळी आणखी चार जणांची भर पडली. त्यात दोन महिला व दोन पुरुष असून ते सर्व मूर्तिजापूर येथील रहिवासी आहेत.

८१.४५ टक्के रुग्ण करोनामुक्त

आज दिवसभरात कोविड केअर केंद्रामधून १०, खासगी रुग्णालय व हॉटेलमधून पाच असे एकूण १५ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्हय़ातील १६८२ जण करोनामुक्त झाले आहेत. त्याचे प्रमाण ८१.४५ टक्के आहे.