मुंबईतील बेस्टला सहकार्य करण्यासाठी पाठविण्यात आलेल्या एसटीच्या शंभरहून अधिक कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली आहे. मुंबईहून परतलेले ९६ कर्मचारी बाधित आढळल्याचे विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी सांगितले, तर कर्मचारी संघटनेने बाधित कर्मचाऱ्यांची संख्या ११६ असल्याचे सांगितले.

मुंबईतील लोकल सेवा बंद असल्याने प्रवासी वाहतुकीचा मोठा ताण बेस्टवर आहे. यासाठी राज्य परिवहन विभागातील सांगली विभागातील ४२५ कर्मचारी पाठविण्यात आले होते. हे कर्मचारी दोन दिवसांपूर्वी परतले असून यापकी ९६ कर्मचारी करोनाबाधित झाले असल्याचे वैद्यकीय चाचणीनंतर समोर आले असल्याची माहिती विभाग प्रमुख अमृता ताम्हणकर यांनी दिली.

बाधित झालेल्या कर्मचाऱ्यांना महामंडळाने १४ दिवसांची अतिरिक्त रजा मंजूर केली असून त्यांच्यात करोनाची कोणतीही  लक्षणे आढळून आली नसल्याचेही श्रीमती ताम्हणकर यांनी सांगितले. चाचणी अहवाल सकारात्मक आल्याने त्यांना गृह विलगीकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कर्मचारी संघटनेचे नेते अशोक खोत यांनी बाधित कर्मचाऱ्यांची संख्या शंभरहून अधिक असल्याचे सांगत एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचा आरोप केला. मुंबईहून परतल्यानंतर त्यांची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्याची तसदीही घेण्यात आली नाही. हे कर्मचारी घरी गेल्यानंतर अन्य नागरिकांनी सांगितल्यानंतर ही चाचणी करण्यात आली.

कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत सेवा बजावण्यासाठी गेलेल्या ४२५ कर्मचाऱ्यांपकी ११६ जण बाधित झाले आहेत. यामध्ये विविध आगारातील बाधित कर्मचाऱ्यांची संख्या अशी- सांगली, मिरज, इस्लामपूर प्रत्येकी ६, विटा, कवठेमहांकाळ प्रत्येकी १४, जत, आटपाडी १५, शिराळा १६ आणि तासगाव आगार २४.