पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे पाच ते सहा फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे दहा फूट पाणी साचले असल्याने, या मार्गावरील मालट्रक व जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली. साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर कोल्हापूर,कर्नाटक,केरळकडे जाणारी ४०० वाहने रोखण्यात आली आहेत.

पाऊस आज उघडला असून, सूर्य दर्शन झाले आहे. तरीही पाणी पातळी केवळ सहा इंचाने कमी झालेली आहे. पाणी संथ गतीने कमी होत आहे. त्यामुळे आज महामार्गावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता नसल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले. आनेवाडी टोल नाक्यावर थांबलेल्या चारशेहुन अधिक वाहनधारकांना अन्नधान्य पॅकेटचे वाटप सातारा पोलीस प्रशासनाने व स्थानिक नागरिकांनी केले.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे सर्वत्र जलमय परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने कोल्हापूर, सांगली, निपानी कर्नाटक केरळ, गोवा व मुंबई पुण्याकडुन येणारी वाहने साताऱ्यातील आनेवाडी टोलनाका खंडाळा शिरवळ कराड येथे प्रशासनाकडून अडवण्यात आली आहेत.

आनेवाडी टोलनाक्यावर थांबलेल्या वाहनांची संख्या चारशेच्या आसपास असून मालवाहतूक तसेच खासगी वाहन चालकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले. राज्य वाहतुक संघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी आणि भुईंज पोलिसांनी अडकलेल्या वाहन चालकांना फूड पॅकेट वाटप केले. सातारा जिल्ह्यात महामार्गावर अडकून राहिलेल्या प्रवाशांना जिल्यातील संस्थांनी पुढे येऊन सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.