पालघर : पालघर जिल्हा प्रशासनाकडून टाळेबंदीच्या कालावधीत जिल्ह्यातून ४४ गाडय़ा परराज्यात सोडण्यात आल्या. वसईहून सोडण्यात आलेल्या गाडय़ांच्या तुलनेत पालघर येथून सोडण्यात आलेल्या गाडय़ांची संख्या कमी असल्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा येथील हजारो श्रमिक पालघर— बोईसर परिसरात अडकून पडले आहेत.

जिल्ह्यातून मे अखेपर्यंत एकूण ४४ श्रमिक रेल्वेगाडय़ा सोडण्यात आल्या असून त्यामधून ७३ हजार कामगारांची रवानगी त्यांच्या मूळ गावात करण्यात आली. यामध्ये उत्तर प्रदेशसाठी ३०, बिहारकरिता पाच, राजस्थानसाठी तीन, ओडिशासाठी दोन तर मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड व झारखंडसाठी प्रत्येकी एक गाडी सोडण्यात आली. या गाडय़ांमधून उत्तर प्रदेशमधील ५२ हजार, बिहारमधील आठ हजार, राजस्थानमधील साडेचार हजार नागरिकांची रवानगी करण्यात आली होती.

वसई येथून ३०श्रमिक गाडय़ा सोडण्यात आल्या होत्या, तर पालघरमधून १३, तर डहाणू येथून एका गाडीचा समावेश होता. वसई येथून ४९ हजारांहून अधिक श्रमिकांना मूळ गावी जाण्याची संधी मिळाली असली तर तुलनात्मक पालघर व डहाणू येथील जेमतेम २४ हजार श्रामिकांना आपले मूळ गाव गाठता आले. सद्य:स्थितीत पालघरमधील काही सेवाभावी संस्थांनी उत्तर प्रदेश, बिहार येथील गावी जाणाऱ्या तीन हजार श्रमिकांची माहिती पालघर तहसील कार्यालयात पाठवली होती. मात्र ३१ मेनंतर श्रमिक गाडय़ा सोडण्याचे बंद झाले असल्याने परराज्यातील श्रमिकांना सध्या पालघर तालुक्यातच वास्तव्य करावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाने वेगवेगळ्या राज्यांत थेट रेल्वे सेवा सुरू केल्या असल्या तरी सद्य:स्थितीत या सर्व गाडय़ांचे ३१ जुलैपर्यंत पूर्णपणे बुकिंग झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.  दरम्यान, तारापूर येथील औद्योगिक वसाहतीमधील कामगारांची संख्या पाहता पालघरहून अधिक प्रमाणात श्रमिक गाडय़ा सोडायला हव्या होत्या, अशी भावना येथील उत्तर भारतीय नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.