प्रदीप नणंदकर

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचा गेल्या सहा महिन्यांपासून पगार होत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे.

वॉर्डबॉय, सफाई कामगार, महाविद्यालयाच्या परिसराची सफाई करणारे व रुग्णालय व्यवस्थापनात काम करणारे कर्मचारी करोनाच्या काळातही पगाराविना काम करत आहेत. लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी जी. एल. बोईनुल यांना विचारणा केली असता त्यांनी गरजेनुसार वॉर्डबॉय कामावर घ्यावे लागतात. सुमारे १०० वॉर्डबॉय काम करत आहेत. अंतर्गत स्वच्छता, परिसराची स्वच्छता, याशिवाय सुरक्षा विभागात काम करणारे कामगार व हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फम्रेशन सिस्टीम यात ते कार्यरत आहेत, मात्र ते ज्या कंत्राटदारामार्फत काम करतात त्या कंत्राटदार कंपन्यांचे पैसे थकीत असल्याने त्या लोकांना पगार मिळत नाही ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले.

राज्यातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयात अशीच स्थिती असून हजारो कामगार गेल्या सहा महिन्यांपासून पगाराविना काम करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कामाची दखल घेतली गेली पाहिजे. वैद्यकीयक्षेत्रात काम करणाऱ्यांना कोरोना योद्धे म्हणून गणले जाते. याच विभागात अत्यल्प मानधनावर व अतिशय महत्त्वाची सेवा बजावणारे हे कामगार आहेत, मात्र या कामगारांचे पैसे थकीत असल्याने त्यांची उपासमार होते आहे. शासनाकडून संबंधित कंत्राटदाराचे पैसे दिले गेले नाहीत त्यामुळेच कंत्राटदारांनी कामगारांचे पैसे थकवलेले आहेत.

आठ दिवसांत पैसे दिले जातील : वैद्यकीय शिक्षणमंत्री

कोरोनामुळे पैसे वेळेवर मिळण्यात थोडीशी अडचण झाली. अर्थ मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असून आठ दिवसांत पैसे दिले जातील. आपले शासन या विषयात प्राधान्याने लक्ष देत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

लक्ष देण्याची गरज : सावे

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांनी या प्रश्नावर शासनाचे लक्ष वेधले आहे. राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात अतिशय महत्त्वपूर्ण सेवा देणारे कंत्राटी लोक हे अत्यल्प मानधनावर काम करत आहेत. राज्यशासन कायम सेवेत असणाऱ्या लोकांचे पैसे नियमित देते. अतिशय महत्त्वपूर्ण सेवा बजावणाऱ्या कंत्राटी लोकांच्या मानधनाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून ही मंडळी काम करत असल्याने यांचे पैसे तातडीने देण्याची गरज असल्याचे सावे यांनी सांगितले.