दिगंबर शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपुरे पशुखाद्य आणि त्यातही ‘क’ जीवनसत्त्वाचा अभाव यामुळे बेजार झालेल्या कुकुटपालन केंद्रावरील कोंबडय़ांनी सहनिवासी कोंबडीवरच ताव मारण्याचे प्रकार सांगलीत दिसून येत आहेत. बॉयलर कोंबडीची मागणी गेल्या काही दिवसात जवळपास ठप्प झाली आहे. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पोल्ट्री व्यावसायिकांनी असलेल्या कोंबडय़ांना पशूखाद्य, जीवनसत्त्वाचा पुरवठा करणे कमालीचे अवघड बनले आहे.

बाजारपेठेतील मांसाची मागणी पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्याकडून बॉयलर कोंबड्यांची खरेदी केली जाते. गेल्या दोन महिन्यापासून  करोना होण्यास चिकन कारणीभूत असल्याची अफवा  पसरल्याने  खरेदी करण्यास ग्राहकच येत नाही. यामुळे पोल्ट्रीतील बॉयलर कोंबडी उत्पादनाचे काय करायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काहींनी मोफत कोंबडी वाटून यावर खाद्य खर्चातून सुटका करून घेतली असली तरी काही व्यावसायिकांनी बॉयलर कोंबडया अद्याप सांभाळल्या आहेत. मात्र त्यांची खाद्याची व व्हिटॅमिनची गरज टाळेबंदीमुळे पूर्ण करणे अशक्य झाले आहे. यातच मका आवक थंडावली असून बाजारात  उपलब्ध नाही.

खाद्यातून व्हिटॅमिनचा योग्य पुरवठा होत नसल्याने शेडमध्ये असलेल्या कोंबड्या एकमेकांना चोचीने मारून घायाळ करीत प्रसंगी मारून आपली गरज भागवत असल्याचे चित्र काही पोल्ट्रीमध्ये दिसून येत असल्याचे पोल्ट्री व्यावसायिक शत्रुघ्न जाधव यांनी सांगितले. तर मक्याची साठेबाजी होत असून काही व्यापाऱ्यांनी आपल्या गोदामामध्ये मक्याची साठवणूक केली असल्याची तक्रारही खानापूर तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेने जिल्हा  पुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचे जाधव यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hungry chickens in sangli poultry on each others lives abn
First published on: 07-04-2020 at 00:41 IST