06 July 2020

News Flash

कराडजवळ पकडलेल्या २५ जणांवर वन्यप्राण्यांच्या शिकारीचा संशय

पुणे-बंगळूरू महामार्गावरील वहागाव ते खोडशी परिसरातून शनिवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मध्यप्रदेशातील सुमारे २५ लोकांची वनखात्याकडून चौकशी सुरू असून, या पारध्यांकडून वाघाची अथवा वन्यप्राण्यांची शिकार

| March 6, 2014 04:20 am

पुणे-बंगळूरू महामार्गावरील वहागाव ते खोडशी परिसरातून शनिवारी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या मध्यप्रदेशातील सुमारे २५ लोकांची वनखात्याकडून चौकशी सुरू असून, या पारध्यांकडून वाघाची अथवा वन्यप्राण्यांची शिकार केली गेली किंवा काय याचा तपास केला जात असल्याचे सांगण्यात येते.
संबंधित मध्यप्रदेशातील लोक सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये शिकारीच्या उद्देशाने आले होते. त्याबाबतची खात्रीशीर माहिती वन्यजीव विभागाला मिळाली. त्यानुसार वनखात्याने पोलिसांना पत्र दिले असून, याकामी पोलिसांनीही सहकार्याची भूमिका ठेवली असल्याचे तळबीड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शहाजी निकम यांनी सांगितले. महामार्गावर वहागावनजीक पोलिसांनी शनिवारी केलेल्या कारवाईच्यावेळी पोलीस कारवाईच्या भीतीने पळून जाणाऱ्या महिलेला अनोळखी वाहनाने धडक दिल्याने तिच्यासह तीन चिमुरडय़ा मुलींचा दुर्दैवी अंत झाला होता. या चौघींचे मृतदेह नातेवाइकांनी ओळख पटवून ताब्यात घेतले आहेत. त्यावेळी संबंधित नातेवाइकांनी कोणाविरूध्द तक्रार नसल्याचा जबाब पोलिसात दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. पोलिसांनी चौकशी केलेले लोक प्राथमिक तपासात राजपारधी समाजाचे असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, हे लोक नागपूर विभागातील बेहलिया समाजातील असल्यास ते वाघाच्या शिकारीसाठीच आले असल्याचा वनखात्याने अंदाज बांधला असून, या अनुषंगाने वनखाते पोलिसांकडून ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची माहिती घेवून अधिक तपास करत आहेत. मध्यप्रदेशातील कटणी मुळगाव विभागातील लोक अनेक वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शिकारीच्या उद्देशाने येत असल्याची, तसेच त्याबाबत अधिकृत माहिती वन्यजीव विभागाला मिळाली असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांच्या कारवाई दरम्यान, ताब्यात घेतलेल्या संशयितांची संपूर्ण माहिती द्यावी, असे पत्र वन्यजीव विभागाने पोलिसांना दिले आहे. त्यानुसार वनखाते व पोलिसांच्या समन्वयातून संशयितांकडून वन्यप्राण्यांची शिकार झाली किंवा काय याचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 6, 2014 4:20 am

Web Title: hunting doubt of wildlife on 25 members near karad
टॅग Karad,Wildlife
Next Stories
1 जागतिक महिलादिनानिमित्त ‘गृहिणी महोत्सवा’चे आयोजन
2 तरुणीच्या खूनप्रकरणी दिरांना जन्मठेप
3 दहावीच्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
Just Now!
X