जोंधळ्याला लगडलेल्या चांदण्याची पार्टी!

सुरती, गुळभेंडी, कुचकुची, .. खास हुरडय़ासाठीच्या ज्वारीच्या या जाती. त्यांच्या सोनसर कणसातील मधुर कोवळे दाणे.. शेतातल्या झाडाखालच्या एखाद्या आगटीत आदबशीर भाजलेले.. त्यासोबत चवीला वांग्याचे भरीत, शेंगदाणा-खोबऱ्याची, लसणाची झणझणीत चटणी आणि त्यावर चवदार ताक किंवा मठ्ठा. तृप्त होणे म्हणजे काय हे रसनेला शिकविणारा हा गावरान बेत. चढत्या हिवाळ्याबरोबर सोलापूरच्या शिवारांतून आता हे बेत आखले जाऊ लागले आहेत. सोलापूरच नव्हे, तर पुणे, अहमदनगर जिल्ह्य़ांतील ग्रामीण भागांतून हुरडा पाटर्य़ाना सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राच्या शिवार-संस्कृतीतील एक महत्त्वाचा भाग असलेल्या या खाद्योत्सवाला आता व्यावसायिक बाजही चढू लागला आहे.

Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय
Attack on hotel businessman
आपटे रस्त्यावर हॉटेल व्यावसायिकावर हल्ला करणारे गजाआड; संपत्तीच्या वादातून मेहुण्याकडून मध्य प्रदेशातील पहिलवानांना सुपारी

सोलापूर जिल्हय़ात मंगळवेढा परिसर ज्वारीचे कोठार म्हणून ओळखला जातो. या भागातील मालदांडी ज्वारी खूप प्रसिद्ध आहे. या ज्वारीपासून बनवलेली भाकरी खूपच लज्जतदार आणि तेवढीच आरोग्यदायी असते म्हणून येथील ज्वारीला प्रचंड मागणी असते. हुरडा म्हणजे कोवळ्या अवस्थेतील ज्वारी होय. अर्थात, भाकरीसाठी वापरल्या जाणाऱ्या ज्वारीपेक्षा खास हुरडय़ासाठी म्हणून वैशिष्टय़पूर्ण जातीच्या ज्वारीची लागवड केली जाते. सुरती, गुळभेंडी, कुचकुची असे हुरडय़ाच्या ज्वारीचे वेगवेगळे प्रकार असतात. सोलापूर परिसरात साधारणत: सुरती हुरडा मिळतो. शेतात एखाद्या झाडाखाली गौऱ्यांची आगटी (चूल) पेटवून हुरडा भाजून गोलाकार पंगतीत गरमागरम व लुसलुशीत हुरडा खायला दिला जातो. अलीकडे अशा हुरडा पाटर्य़ाही व्यावसायिक पद्धतीने आयोजित करण्यात येत असून, कृषी पर्यटनाला त्यांचीही जोड दिली जात आहे. सुमारे महिनाभर अशा हुरडा पाटर्य़ा शेतात झडत असतात.

सोलापुरात महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाशी (मार्ट) संलग्न असलेली सातपेक्षा अधिक कृषी पर्यटन केंद्रे आहेत. सोलापूरपासून १५ मिनिटांच्या अंतरावर पुणे रस्त्यावर पाकणी येथे अभिषेक मळा कृषी पर्यटन केंद्रात हुरडा पाटर्य़ासाठी आठ-दहा दिवस अगोदर नावनोंदणी सुरू होते. वानप्रस्थ कृषी पर्यटन केंद्र (देगाव, सोलापूर), राजवन कृषी पर्यटन केंद्र (तोळनूर, ता. अक्कलकोट), सावड ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र (शेजबाभुळगाव, ता. मोहोळ), श्रीराम कृषी पर्यटन केंद्र (वडाळा, ता. उत्तर सोलापूर), पिकनिक पॉइंट कृषी पर्यटन केंद्र (चिंचोळी काटी, ता. मोहोळ), राजगड कृषी पर्यटन केंद्र (रामवाडी, ता. करमाळा) यांचा त्यात समावेश आहे. याशिवाय सोलापुरात कुमठे येथे सिंगी फार्म हाउस हेदेखील हुरडा पाटर्य़ासाठी प्रसिद्ध होत आहे. सकाळी लवकर हुरडा खाण्यासाठी जाणे चांगले. नावनोंदणीनंतर ठरलेल्या वेळेत कृषी पर्यटन केंद्रात पोहोचल्यानंतर अगोदर फलाहाराचा आस्वाद घेता येतो. शेतशिवारात बैलगाडीत बसून फेरफटका मारल्यानंतर हुरडय़ाचा खासा बेत असतो. खास रंगलेल्या गप्पांमध्ये हुरडय़ाची चव न्यारीच असते. पुन्हा फेरफटका मारल्यानंतर किंवा शेतात गोटय़ा, विटीदांडू, लगोरी, भोवरा अशा ग्रामीण खेळांचा आनंद लुटल्यानंतर दुपारी दोन-अडीचपर्यंत जेवणावर ताव मारता येतो. या दिवसभराच्या आनंद सफरीसाठी दरमाणशी सहाशे रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. छोटय़ा बालगोपाळांसाठी व शालेय-महाविद्यालयीन सहलीसाठी शुल्कात २५ ते ४० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. येत्या महिन्यात मकरसंक्रांतीनंतर या पाटर्य़ाना बहार येईल.

सोलापूरप्रमाणे अहमदनगर येथेही जोंधळ्याला लगडलेल्या या चांदण्याच्या, हुरडय़ाच्या पाटर्य़ा रंगतात. तेथील पांजरापोळ या सुमारे शंभर वर्षे जुन्या संस्थेच्या शेतात होणाऱ्या हुरडा पाटर्य़ाची ख्याती दूरवर पोहोचली आहे. म्हणून मुंबई, ठाणे, कोकण आदी भागांतून अनेक कुटुंबीय हुरडय़ाची चव चाखण्यासाठी पर्यटन करतात. आसपासच्या परिसरात प्रमुख रस्त्यांवरही हुरडा विकला जातो.