पालघर रेल्वे स्थानकांतर्गत रस्त्यावर दुचाकींचा तळ; रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : पालघर रेल्वे स्थानकाबाहेर असलेल्या सशुल्क वाहनतळ (पे अँड पार्क) योजनेअंतर्गत बंदिस्त ठेवण्यात आल्याने मुंबई आणि इतरत्र जाणाऱ्या शासकीय कर्मचारी त्यांची वाहने रेल्वेच्या अंतर्गत रस्त्यालगत उभी करीत आहेत. त्यामुळे पालघर रेल्वे स्थानकात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णवाहिका, अग्निशमन बंब आणि इतर वाहनांच्या वाहतुकीसाठी मार्गच उपलब्ध राहणार नाही, अशी स्थिती आहे.

पालघर रेल्वे स्थानकाचे मुख्य प्रवेशद्वार आणि आवार टाळेबंदीत पत्रे उभारून बंदिस्त करण्यात आले. त्यामुळे नवीन पुलाच्या बांधकामासाठी निर्माण केलेल्या हंगामी प्रवेशद्वारातूनच वाहने स्थानक परिसरात येण्याची सोय आहे.

स्थानक आवारातील ‘पे अँड पार्क’ योजनेअंतर्गत वाहनतळ निर्माण करण्यात आले. सध्या ही योजना बंद असल्याने त्या आवाराला बंदिस्त ठेवण्यात आले आहे. पालघर येथून अनेक नागरिक आपत्कालीन सेवेत कार्यरत असून ते दररोज सकाळी मुंबई, उपनगर व इतरत्र कामाला जात असतात. अशा परिस्थितीत मुख्य स्थानकाकडे जाणाऱ्या रेल्वेअंतर्गत मार्गात दुचाकी उभ्या केल्या जात आहेत.

रेल्वे स्थानकात अपघात घडला वा  आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास रुग्णवाहिका, अग्निशामक दलाचा बंब किंवा इतर कोणतेही वाहन रेल्वे स्थानकाजवळ नेण्यासाठी सध्या मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे रिकामे असलेले वाहनतळ आपत्कालीन सेवेतील नागरिकांच्या वाहनांसाठी खुले करण्याची मागणी पुढे येत आहे. वाहनतळ व रेल्वे परिसरातील जागेचा ताबा रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असून यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करावा लागणार असल्याचे स्थानीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

‘आरपीएफ’ला पत्र

रेल्वेस्थानकात जाणाऱ्या मार्गातील दुचाकी व इतर वाहने हटविण्यासाठी लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधण्यात आला आहे. प्रशासनाने अंतर्गत रस्त्यावरील वाहनांसाठी पर्यायी व्यवस्था करावी अथावा तेथे वाहने उभी करण्यास प्रतिबंध करावा, अशा आशयाचे पत्र आरपीएफ यांना दिल्याचे निरीक्षक अनिल सोनावणे यांनी  सांगितले.