चक्रीवादळाचा फटका; वृक्षतोड करणे, छप्पर दुरुस्तीची कामे रेंगाळली

पालघर: अरबी समुद्रात सोमवारी झालेल्या चक्रीवादळाचा फटका पालघर जिल्ह्यचा मोठय़ा प्रमाणात बसला आहे. जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजात जिल्ह्यत ५० झाडे पडल्याची व ३३७ घरांचे छप्पर उडाल्याची माहिती दिली असली तरी प्रत्यक्षात हा आकडा कितीतरी पटींनी अधिक असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत पडलेली झाडे दूर करण्यासाठी व छप्पर दुरुस्ती करण्यासाठी कारागिरांची व मनुष्यबळाची तीव्र टंचाई जाणवत आहे.

पालघर तालुक्यात एक हजारहून अधिक झाड पडण्याच्या किंवा तुटण्याच्या घटना घडल्या आहेत. झाडे तोडण्यासाठी तालुक्यात सात ते दहा कुशल कारागीर असून बेकरी व वखारीना लाकडे देणाऱ्या या मंडळींकडे असलेले कामगार टाळेबंदीच्या काळात मूळगावी गेले आहेत. त्यामुळे मोडलेल्या झाडाची बांधणी करणे, त्यांना खाली उतरवणे, झाडाची छाटणी करून लाकडे एकत्र करून ठेवण्यासाठी विलंब लागत आहे.

शिवाय अनेक ठिकाणी विद्युत प्रवाह खंडित असल्याने लाकूड तोडण्यासाठी करवत व कुऱ्हडीचा वापर करावा लागत असून ही कामे करण्यास उशीर होत आहे.

झाडे पडल्याने छपरावरील पत्रे फुटणे, वाऱ्याने छप्पर उडून जाणे, पत्रे निखळून पडणे असे शेकडो प्रकार घडले असून त्या दुरुस्तीसाठी देखील कुशल मनुष्यबळाची गरज आहे. शिवाय दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य हार्डवेअरच्या दुकानात मोजक्या वेळेत मिळत असल्याने या कामांची गती मंदावली आहे. टाळेबंदीमुळे पत्र्यांची उपलब्धतेची समस्या निर्माण झाली असून १५ दिवसावर मान्सून येऊन ठेपल्याने दुरुस्ती करण्यासाठी सर्वच बाधित पाठपुरावा करत असल्याचे संबंधित व्यावसायिकांनी सांगिले.

जिल्हा प्रशासनाने गेले दोन दिवस संपूर्ण दिवस हार्डवेअर व इलेक्ट्रिकल साहित्याची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा दिली असली तरी हा निर्णय आगामी काळासाठी कायम ठेवावा अशी मागणी दुरुस्ती व मान्सून पूर्वतयारीतील व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.

सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस

  • पालघर : अरबी समुद्रातील चक्रीवादळ यांच्या अनुषंगाने पालघरला सोमवारप्रमाणे मंगळवारीदेखील जोरदार पावसाने झोडपून काढले. पालघर जिल्हा तालुक्यात मंगळवारी दिवसभरात तब्बल १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
  • सोमवारी पालघर तालुक्यात २९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असताना मंगळावर दुपापर्यंत पावसाचा जोर कायम होता. दुपारनंतर पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी तालुक्यात १९८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
  • मंगळवारी दिवसभरात डहाणू तालुक्यात ७६ मिलिमीटर, वाडा तालुक्यात ६८ मिलिमीटर, जव्हार तालुक्यात ६५ मिलिमीटर, विक्रमगड तालुक्यात ५६ मिलिमीटर, वसई तालुक्यात ४९ मिलिमीटर, तलासरी तालुक्यात ३५ मिलिमीटर तर मोखाडा तालुक्यात ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बुधवारी काही ठिकाणी निवडक सरींच्याव्यतिरिक्त जिल्ह्यत आकाश निरभ्र राहिले.