News Flash

चक्रीवादळाने बांदा परिसराचे नुकसान

डेगवेत एका भंगाराचे पत्र्याचे छप्पर उडाले, पण सुदैवाने २० ते २५ कामगार बचावले.

डेगवेत एका भंगाराचे पत्र्याचे छप्पर उडाले, पण सुदैवाने २० ते २५ कामगार बचावले.

सावंतवाडी तालुक्यातील बांदा, डेगवे, इन्सुली, वाफोली, बिलवडे, डींगणे, तांबोळी, असनिये या गावांना काल शनिवारी रात्रीच्या चक्रीवादळाने रौंद्र रुप धारण करून दाणादाण उडवली. डेगवेत एका भंगाराचे पत्र्याचे छप्पर उडाले, पण सुदैवाने २० ते २५ कामगार बचावले. या चक्रीवादळात विजमंडळ, काजू, कोकम, केळी बागायती, घरांचे प्रचंड नुकसान झाले. सुमारे चार कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज असून किमान आठवडाभर चक्रीवादळाचा तडाका बसणारे गाव काळोखात राहण्याची शक्यता आहे. दरम्यान पालकमंत्री दिपक केसरकर यांनी यंत्रणेला पंचनाम्याचे आदेश दिले असले तरी आपत्कालीन यंत्रणा कार्यरत नव्हती.

पावसाळा सुरू झाल्यावर १ जून पासून आपतकालीन यंत्रणा सुरू होते, पण जिल्हा आपतकालीन यंत्रणेकडे आजच्या आपत्तीबाबत काहीच माहिती नव्हती. विज मंडळाचे जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरी यांना वीज कंट्रोल रुममधून आपत्तीबाबत गंभीर माहिती दिली नाही. त्यामुळे वीज मंडळ पावसाळी आपत्तीबाबत नापास झाल्याचे उघड झाले.

काल शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास चक्रीवादळ झाले. त्यानंतर रात्री ११ वाजेपर्यंत पाऊस कोसळत असतानाच विजांच्या लखलखाटासह चक्रीवादळाने थैमान घातले. माकडतापाने हैराण झालेल्या बांदा सरमरवाडी, डेगवे भागात चक्रीवादळाने अस्मानी संकट उभे केले. या चक्रीवादळात बांदा, डेगवे, बिलवडे, वाफोली, शेल, उन्सुली, डिंगणे, असनीने, तांबोळी, घारपी याोगातही अस्मानी संकट उभे राहिले. चक्रीवादळाने बागायती व इमारती योग्य झाडे मधोमध तुटून घरावर, वीज तारावर कोसळली. त्यामुळे विजेचे खांब उन्मळून पडले तसेच वीज वाहक तारा रस्त्यावर कोसळल्या.

शनिवारी रात्री आलेल्या अवकाळी पावसाने बांदा, डेगवे, बिलवडे भागात चक्रीवादळाचा मोठा फटका बसला. केळी, आंबा, काजू, नारळ, कोकम, सुपारी बागायतींना मोठा फटका बसला. या बागायतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

बांदा- पानवळ, डेगवे या रस्त्यावर झाडे उन्मळून पडली. त्यामुळे वीज तारा देखील रस्त्यावर आल्या. त्यानंतर बांदा- दोडामार्ग हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला तसेच बांदा- विलवडे- दाणोली रस्त्यावर देखील झाडे व वीज तारा कोसळल्या. त्यामुळे हा रस्ताही वाहतुकीस बंद झाला.

डेगवेत लोकांनीच रस्ता खुला केला

डेगवे गावात लोकांनीच रस्त्यावर कोसळलेली झाडे बाजूला केली. तसेच आज सकाळी जेसीबीच्या साहाय्याने झाडे दूर केली, पण वीज तारा मात्र लोंबकळतच होत्या. बांदा- बिलवडे- दाणोली मार्ग उशिरापर्यंत वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता.

आपत्कालीन यंत्रणा झोपली

पाऊस सुरू होणार म्हटल्यावर दि. १ जून पासून आपतकालीन यंत्रणा सुरू होणार असा शासकीय अलिखित नियम ठरला आहे. त्यामुळे आज रविवार असल्याने सर्व अधिकारी सुट्टीवर होते. त्यामुळे वीज मंडळाला आपत्तीचा निश्चित नुकसानीचा आकडा माहित नव्हता त्यासाठी वीज जनसंपर्क अधिकारी अजित इगतपुरी यांना संपर्क साधला असता त्यांनी वीज कंट्रोल विभागाला संपर्क साधला पण चक्रीवादळाने लोक काळोखात असल्याचे या विभागाला माहित नव्हते असे श्री. इगतपुरी यांच्या बोलण्यावरून उघड झाले. वीज कंपनीला बांदा- डेगवे, बिलवडे दशक्रोशीतील लोक काळोखात आहेत त्याची कल्पना नव्हती, तसेच नेमके किती नुकसान झाले आणि वीज पूर्ववत केव्हा होईल त्याबाबतही माहित नव्हते. पावसाळा तोंडावर येवूनही वीज कंपनी आपत्तीसमोर नापास झाल्याचा ढळढळीत पुरावा चक्रीवादळाच्या तडाख्याने जनतेसमोर आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 8, 2017 1:39 am

Web Title: hurricane damage in banda area
Next Stories
1 राजापुरात गंगा अवतरली
2 कर्जमुक्ती न झाल्यास लढाई!
3 दाभाडीचे शेतकरी दिल्लीत धडकणार
Just Now!
X