दोन मुलांची आई असलेली विवाहिता गावातील युवकासोबत पळून गेल्याचा राग मनात धरून तिचा खून करून शेतात मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला. या प्रकरणात मृत महिलेचा पती अनिल काळे व सासरा सुदाम काळे या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. खुनाच्या कटात या विवाहितेचा भाऊ व मामाचा सहभाग असल्याचेही उघड झाले.
दारेफळ (तालुका वसमत) येथील शेषराव भालेराव याची बहीण राधा हिचा विवाह एरंडेश्वर (तालुका पूर्णा) येथील अनिल काळे याच्याशी आठ वर्षांपूर्वी झाला होता. दोघांचा सुखी संसार चालू असताना त्यांना मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये झाली. त्यानंतर राधाच्या वागण्यात बदल झाला व ३१ जानेवारीला गावातीलच युवकासोबत घर सोडून पळून गेली. सासरच्या तक्रारीवरून पूर्णा पोलिसांत मिसिंगची तक्रार दाखल झाली. तीन महिन्यांनंतर राधा तिच्या प्रियकरासोबत नाशिकला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या मदतीने सासरच्यांनी तिला गोडीगुलाबीने घरी आणले. राधा पळून गेल्याने सोयऱ्याधायऱ्यात मान खाली घालावी लागते, ही भावना सासरसह तिच्या माहेरच्या लोकांत होती.
यातूनच राधाचा पती अनिल काळे, भाऊ शेषराव भालेराव (दारेफळ), मामा दिलीप माणिकराव खटिंग (झाडगाव) या तिघांनी राधाचा काटा काढण्याचा कट केला. राधाला जिवे मारून मृतदेह विहिरीत टाकला. एक-दोन दिवसांनी मृतदेह पाण्यावर तरंगत असताना बाहेर काढून शेतातच तिला जाळून टाकले. राधा विहिरीत पडून मरण पावल्याची माहिती पोलीस व गावच्या पोलीस पाटलापासून लपून ठेवली. मृतदेह जाळल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी हाडे पोत्यात भरून बाजूलाच खड्डय़ात पुरले. राख वा इतर पुरावा राहू नये, म्हणून शेताला नांगरट केली. हा प्रकार २१ मे रोजी घडला.
आठ दिवसांनी या घटनेची गावात दबक्या आवाजात चर्चा होऊ लागली. ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली. शुक्रवारी सकाळीच पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पाहणीनंतर राधाचा पती अनिल व सासरा सुदाम काळे या दोघांना ताब्यात घेतले. दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. रात्री उशिरा राधाचा मामा दिलीप खटिंग व भाऊ शेषराव भालेराव यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती मिळाली.