घरगुती वादातून लोहारा परिसरात देशीकट्टय़ातून सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास पतीने गोळी झाडल्यावर पत्नी जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

माहेरी येऊन राहणाऱ्या पत्नीची समजूत काढूनही ती नांदण्यास तयार नसलेल्या पत्नीवर पतीने कट्टय़ातून गोळी झाडली. पत्नीच्या सतर्कतमुळे गोळी कानाला चाटून गेल्याने पत्नी सोनी दोहेरी जखमी झाली असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ग्यानसिंग सुरपालसिंग दोहेरी (२७,रा. शिरोणा, जि. झाशी) याचा विवाह लोहारा येथील सोनी नावाच्या युवतीशी झाला होता. विवाहनंतर ग्यानसिंग व सोनी यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर सोनी माहेरी येऊन राहू लागली. दरम्यानच्या काळात ग्यानसिंग दोहेरी याने सोनीस सासरी नांदावयास जाण्याबाबत वारंवार विनवणी केली. मात्र, काही एक उपयोग न झाल्याने ग्यानसिंगने यवतमाळ गाठले. लोहारा येथील सोनी हिच्या माहेरी जाऊन ग्यानसिंगने सोनीस सासरी नांदावयास येण्याची विनंती केली. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या सोनीने येण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या ग्यानसिंगने तिच्यावर देशीकट्टय़ातून गोळी झाडली. ग्यानसिंगचा स्वभाव ओळखून असलेल्या सोनीने ग्यानसिंगचा पवित्रा अगोदरच हेरला होता. सोनीने सतर्कता बाळगली तरी गोळी तिच्या कानाला चाटून गेली. मात्र, तिची प्रकृती धोक्याबाहेर असून तिच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, गोळीच्या आवाजाने घरातील व शेजारील मंडळी खडबडून उठली. त्यांनी ग्यानसिंगचा पाठलाग करून त्याला चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या हवाली केले.

दीड हजारांची लाच घेताना लिपीक जाळ्यात
बुलढाणा : किराणा दुकानाचा परवाना देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच घेताना कामगार कार्यालयातील लिपिकास रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. इंदिरानगरातील समोर खान नजिमोद्दीन खान (२४) यांनी तक्रार नोंदविली होती की, लिपीक उदय अनंतराव खटी (४५) याने किराणा दुकानाचा परवाना देण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच मागितली. त्यावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्यास रंगेहाथ अटक केली. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक महेश चिमटे, अप्पर पोलीस अधीक्षक आर.एम.तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एस.एल.मुंढे, खंडारे, नाईक, शेकोकार, नेवरे, शेळके, चोपडे, जवंजाळ, ठाकरे, नीलेशा सोळंके, यादव, राजनकर व ढोकणे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.