अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी येथील विवाहित महिलेला तिच्या पतीने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याप्रकरणी अलिबाग येथील सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरवून पाच वष्रे सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा मंगेश मगर असे या मृत महिलेचे नाव आहे. या महिलेचे मंगेश मगर याच्यासोबत लग्न झाले होते. परंतु मंगेश सतत दारू पिऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण करीत असे.

त्यामध्ये मारहाणही करीत होता. दारूच्या व्यसनामुळे त्याने जमीन विक्रीतील पसे व पत्नीच्या अंगावरील दागिने, तसेच घरातील मोठी भांडीही विकली. अलिबाग पोलीस ठाण्यात पत्नीला मारहाण केल्याची तक्रार करण्यात आली होती. तंटामुक्त समिती, महिला सुरक्षा समितीमध्येही प्रकरण गेले होते.

पतीच्या जाचाला कंटाळून रेखाने २० फेब्रुवारी २०१३ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मंगेश मगर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तात्कालीन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध अलिबागमधील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. एन.जी. तुळपुळे यांनी सात साक्षीदारांची साक्ष नोंदविली. साक्षीदारांच्या पुराव्याअंती छळ करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने मंगेश मगर याला दोषी ठरवून तद्र्थ जिल्हा न्यायाधीश बी.सी. कांबळे यांनी पाच वष्रे सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.