वाई तालुक्यातील बोरगावमध्ये एका व्यक्तीने पत्नी आणि मुलावर चाकूने वार करून नंतर स्वतःचा गळा कापून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. यामध्ये पत्नी आणि हल्लेखोर पतीचा मृत्यू झाला असून, मुलगा गंभीर जखमी आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विजय दगडू वाडकर (३२) असे पतीचे नाव आहे. चारित्र्याच्या संशयावरून त्याने पत्नी सारीका विजय वाडकर हिच्यावर घराबाहेर चाकूने वार केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पत्नीच्या गळ्यावर वार केल्यावर विजयने तिथेच असलेल्या आपल्या मुलावरही हातातील चाकूने वार केले. गावातील लोकांसमोरच त्याने पत्नी आणि मुलावर वार केले. मात्र, कोणतीही व्यक्ती त्याला थांबवण्यासाठी पुढे आली नाही. दोघांवर वार केल्यानंतर विजयने गावातील मंदिराजवळ जाऊन स्वतःचा गळा चाकूने कापला.
गावातील लोकांनी पोलिसांना बोलावल्यावर तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे विजय आणि सारिका या दोघांना मृत घोषित करण्यात आले. मुलगा अथर्ववर सध्या उपचार सुरू आहेत. सातारा पोलीस या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.